

पाटणा : बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाल्याचे चित्र दिसत असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये नवा मुख्यमंत्री भाजपचा असू शकतो, तर नितीशकुमार यांचे पुत्र निशांतकुमार यांना बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. पक्षाने नितीश यांच्या उमेदवारीसाठी सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. नितीशकुमार गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. नितीशकुमार १६ मार्चनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, असेही वृत्त आहे. त्यामुळे ते १६ मार्च रोजी राज्यसभेच्या निवडणुका होईपर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहतील.
जेडीयू दुसरा मोठा पक्ष
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून वर्चस्व गाजवले. नितीशकुमार यांचा जेडीयू ८५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. एनडीए आघाडीत चिराग पासवान यांचा पक्ष (एलजेपी-आरव्ही), जीतन राम मांझी यांचा एचएएम आणि उपेंद्र कुशवाहांचा आरएलएम यांचाही समावेश होता. बिहारच्या सत्तेत भाजपचे वर्चस्व सर्वात महत्त्वाचे असल्याने नितीशकुमार यांच्यानंतर पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होऊ शकतो. जर असे झाले तर बिहारच्या इतिहासातील हा एक मोठा टर्निंग पॉईंट असेल. यामुळे बऱ्याच काळानंतर बिहारमध्ये भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.