राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली महाआघाडी तोडल्यानंतर संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीएसोबत जात नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पाटणा येथील राजभवनात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा या दोन नेत्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
आज सकाळीच नितीश कुमार यांनी बिहारच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी संयुक्त जनता दल आणि एनडीए मिळून 128 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
यामुळे सोडली राष्ट्रीय जनता दलाची साथ-
नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर, ही वेळ का आली? असा प्रश्न नितीश यांना पत्रकारांनी विचारला असता, "इस्तीफा देने की नौबत इसलिए आई क्योंकि ठीक नहीं चल रहा था", असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडल्याचे सांगितले. महाआघाडी तोडण्याचा निर्णय का घेतला असे विचारले असता, 'दीड वर्षापूर्वी महाआघाडीत आलो. पण येथेही परिस्थिती चांगली दिसत नव्हती', असे ते म्हणाले. "सबकी राय आ रही थी, पार्टी की राय थी चारों तरफ से कहा जा रहा था जिसके बाद हमने ये फैसला लिया", असे नितीश यांनी सांगितले होते.