नितीशकुमार यांनी घेतली आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ;तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

तेजस्वी यादव यांच्या शपथविधीला त्यांच्या मातोश्री राबडी देवी उपस्थित होत्या
नितीशकुमार यांनी घेतली आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ;तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

भाजपला धोबीपछाड देऊन राजदशी सोयरीक जुळवत जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी बुधवारी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश यांनी हिंदीत देवाच्या नावाने शपथ घेतली. त्यानंतर लगेचच तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

तेजस्वी यादव यांच्या शपथविधीला त्यांच्या मातोश्री राबडी देवी उपस्थित होत्या; मात्र तेजस्वींचे वडील आणि राजदप्रमुख लालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत; मात्र शपथविधीपूर्वी नितीश यांनी लालूंशी फोनवर बोलून राजकीय परिस्थितीची माहिती दिली.

दरम्यान, महागठबंधनने विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे नवीन विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील फ्लोअर टेस्टच्या वेळी होईल. महागठबंधनकडून राजदला अध्यक्षपदाची खुर्ची मिळू शकते; मात्र काँग्रेसनेही यावर दावा केला आहे.

खातेवाटपाचा फॉर्म्युला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजदला ठरलेल्या फॉर्म्युल्यात १६ मंत्रिपदे मिळाली आहेत, तर जेडीयूच्या खात्यात १३ आणि चार काँग्रेस आमदार मंत्री बनू शकतील. १२ आमदार असलेल्या सीपीआयने (एमएल) सरकारमध्ये सामील होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

नितीश यांनी नऊ वर्षांत

दोनदा बदलली आघाडी

नितीशकुमार यांनी २०१३ मध्ये भाजप आणि २०१७ मध्ये राजदसोबतची युती तोडली. दोन्ही वेळा त्यांनी सरकार स्थापन केले आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता २०२२ मध्ये पुन्हा त्यांनी भाजपशी युती तोडली व महागठबंधन करून मुख्यमंत्री झाले आहेत.

नितीशकुमार यांचे

मोदींनाच आव्हान

“निवडणूक काळात त्यांचे (भाजप) वागणे योग्य नव्हते. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला; पण त्यांच्याकडून जेडीयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. तसेच २०२४ सालच्या कोणत्याही पदासाठी आमची दावेदारी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये जिंकले; पण २०२४ मध्ये ते जिंकतील का?” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in