नितीश कुमार दहाव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री, NDA बैठकीत शिक्कामोर्तब, आज शपथविधी

बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे.
नितीश कुमार
नितीश कुमार
Published on

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचे बुधवारी अखेर स्पष्ट झाले. रालोआची एक बैठक बुधवारी पार पडली त्यामध्ये नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे.

बिहार विधानसभेच्या इमारतीत एनडीए आमदारांची बैठक झाली. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

सम्राट चौधरी भाजप विधिमंडळ पक्षनेते

बिहारमध्ये नव्या सरकारची स्थापना करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जेडीयू आणि भाजप आमदारांच्या विधिमंडळ गटाची बैठक बोलावण्यात आली होती. भाजपच्या बैठकीमध्ये सम्राट चौधरी यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपने उपमुख्यमंत्रिपदासाठी आपल्या जुन्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवताना सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in