नितीश कुमारांचा भाजपला धक्का ; युती तोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार असल्याचे वृत्त आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.
नितीश कुमारांचा भाजपला धक्का ; युती तोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
ANI

बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएसोबतची युती तोडल्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला. नितीशकुमार यांनी भाजपला धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. नितीश कुमार यांच्या घरी आज खासदार आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल नवीन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार असल्याचे वृत्त आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे. भाजप-जेडीयू सरकारला फक्त दोन वर्षे झाली असताना हे सरकार पडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. आता हा वाद शिगेला पोहोचला असून नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. नितीशकुमार यांनी यापूर्वीही भाजपशी युती तोडली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयूला कमी जागा असतानाही मुख्यमंत्रीपद मिळाले होते .

logo
marathi.freepressjournal.in