नितीश कुमारांचा सकाळी राजीनामा दुपारी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नाव न सांगण्याच्या अटीवर या सूत्राने सांगितले की, रविवारी सकाळी नितीश कुमार हे राजीनामा देणार आहेत.
नितीश कुमारांचा सकाळी राजीनामा दुपारी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ?

पाटणा : बिहारमधील महाआघाडी सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज (रविवारी) सकाळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी दिली, तर दुपारी ४ वाजता नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते व नितीश कुमार यांचे राजकीय सल्लागार के. सी. त्यागी यांनी दिली.

नाव न सांगण्याच्या अटीवर या सूत्राने सांगितले की, रविवारी सकाळी नितीश कुमार हे राजीनामा देणार आहेत. राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार हे विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावणार आहेत. रविवारीही सचिवालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर नवीन सरकार अस्तित्वात येऊ शकते, असे सूत्र म्हणाले. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी एनडीएला सोडचिठ्ठी देणारे मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा करू नये, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.

नितीश कुमार यांचे राजकीय सल्लागार के. सी. त्यागी म्हणाले की, गाडी आता उजव्या विचारसरणीच्या बाजूने वळली आहे, तर नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्यासाठी नितीश कुमार यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो. तेव्हा विजय चौधरी बाहेरपर्यंत सोडायला आले व नितीश कुमार यांनीही चांगला प्रतिसाद दिला. मात्र, हे राजकारण आहे, येथे काहीही होऊ शकते.

नितीश महाआघाडीतून का बाहेर पडताहेत?

सूत्रांनी सांगितले की, जदयूचे सध्या लोकसभेत १६ खासदार आहेत. २०२४ ला जदयू काँग्रेस व राजदसोबत निवडणूक लढल्यास त्यांच्या जागा घटू शकतात, तर भाजपसोबत गेल्यास १६ किंवा १७ जागा येऊ शकतात. बिहारमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात बैठक सुरू आहे. प्रदेश अध्यक्ष सम्राट चौधरी, विरोधी पक्षनेते विजय सिन्हा, खासदार सुशील मोदी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याबरोबरच पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. रविवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा हे पाटण्याला जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. राजदने आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, मु‌ख्यमंत्री नितीश कुमार हे आदरणीय होते व आहेत. काही बाबी नितीश कुमार यांच्या नियंत्रणात नाहीत. बिहारमध्ये खेळ होणे बाकी आहे. याचाच अर्थ राजद हे नितीश कुमार यांना भाजपसोबत सहजासहजी सरकार बनवायला देणार नाही. राजदने जीतनराम मांझी यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना महाआघाडीत भागीदार बनविण्याची ऑफर दिली.

भाजपची सावध भूमिका

नितीश कुमार ‘इंडिया’तून बाहेर पडण्याच्या चर्चेबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, नितीश कुमार हे स्वेच्छेने राजद व काँग्रेससोबत गेले होते. आता ते त्यांना स्वेच्छेने सोडत आहेत. नितीश कुमार सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय केंद्रीय नेत्यांना घ्यायचा आहे. यावेळी फोडाफोडी करण्यात भाजपचा कोणताच हात नाही, असे हा नेता म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in