
मुंबई: आगामी शैक्षणिक वर्षात नवीन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आणि महाविद्यालयातील जागा वाढविण्यासंदर्भात अर्ज करण्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांना अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत तसेच महाविद्यालयांमधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते.
याबाबतचे परिपत्रक १८ सप्टेंबर रोजी मंडळाकडून जारी करण्यात आले होते. नवीन पदव्युत्तर वैद्यकीय संस्था स्थापन करणे आणि विद्यमान पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये जागा वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाने ८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. शैक्षणिक संस्थांकडून अर्ज करण्यासाठी मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेत वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने वैद्यकीय महाविद्यालयांना अर्ज सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
महाविद्यालय व जागा वाढीसाठी अर्ज करण्यास २२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यासंदर्भातील अटी व शर्ती या मंडळाकडून जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार कायम असणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे नवीन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंताही आता मिटणार आहे.