धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी मंगळवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ‘एक्स’वर नुकतीच एक पोस्ट केली आहे.
धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल
Published on

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी मंगळवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ‘एक्स’वर नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये सिब्बल यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीतील पक्षांनी धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

या अविश्वास प्रस्तावावर सुमारे ६० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस,आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. धनखड हे पक्षपात करतात, ते विरोधी पक्षांच्या सदस्यांना संधी देत नाहीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप आहे. विरोधकांना सभापती सभागृहात बोलण्याची संधी देत नाहीत हे याद्वारे सिद्ध करावयाचे आहे. धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी केली असून, धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधी पक्षांनी मंगळवारी दुपारी राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावावर एकूण ६० सदस्यांच्या सह्या आहेत. मात्र, विरोधकांनी आणलेल्या या प्रस्तावावर सोनिया गांधी आणि अन्य कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या नाहीत. धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाही, असा आरोप या प्रस्तावामधून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी राज्यसभेत प्रस्ताव पारित झाल्यानंतर तो लोकसभेमध्येही पारित होणे आवश्यक असते.

संसदेचे कामकाज स्थगित

दरम्यान, मंगळवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच सत्ताधाऱ्यांनी जॉर्ज सोरोस यांचा तर विरोधी पक्षांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा मुद्दा उचलून धरला. या मुद्द्यांवरूनच सत्ताधारी तसेच विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर आधी लोकसभेचे तर नंतर राज्यसभेचे कामकाज बुधवारी सकाळी ११ पर्यंत स्थगित करण्यात आले. दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत अदानी यांच्याबाबतच्या मुद्द्यांवर सरकारकडून उत्तराची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in