सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ नको; सरन्यायाधीशांनी वकिलांना केले आवाहन

गेल्या दोन महिन्यांमध्ये वकिलांकडून ३६८८ प्रकरणांमध्ये स्थगितीसाठी मागणी
सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ नको; सरन्यायाधीशांनी वकिलांना केले आवाहन
Published on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात 'तारीख पे तारीख' अशा प्रकारच्या कामकाजाला आपल्याला चालू द्यावयाचे नाही, असे सांगत अशा प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांमध्ये स्थगिती आणू पाहाण्याचा प्रयत्न नव्या प्रकरणांमध्ये तरी वकिलांनी करू नये, असे आवाहनही शुक्रवारी त्यांनी केले.

मंगळवारी न्यायालयातील कामकाजाच्या सुरुवातीलाच त्यांनी वकिलांच्या स्थगिती मागण्याच्या कृतीबद्दल लक्ष वेधले. गेल्या दोन महिन्यांमध्ये वकिलांकडून ३६८८ प्रकरणांमध्ये स्थगितीसाठी मागणी करण्यात आली, अशा प्रकाराच्या स्थगितीसाठीची मागणी त्या प्रकरणांमध्ये अतिशय गरज असेल तरच करावी असे स्पष्ट करीत त्यांनी यावेळी न्यायालय 'तारीख पे तारीख' आपल्याला नको असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

'तारीख पे तारीख' हा संवाद दामिनी या हिंदी चित्रटातील सनी देओल यांनी साकारलेल्या वकिलाच्या पात्रातील तोंडचा आहे. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील संवादातून 'तारीख पे तारीख' या अनुषंगाने व्यक्त केलेली भावना आता या निमित्ताने सरन्यायाधीशांनीच या 'तारीख पे तारीख' शब्दातून व्यक्त केली.

ते म्हणाले की, वकिलांच्या सहाय्यामुळे नव्या प्रकरणांची यादी न्यायालयाच्या पटलावर लावल्यानंतर त्यातील टाईम गॅप कमी झालेली आहे. मात्र वकिलांकडून स्थगिती मागून सुनावणी पुढे ढकलली जाते ही देखील वस्तुस्थिती असून त्यामुळे न्यायालयाची वाईट प्रतिमा लोकांमध्ये तयार होते.

अतिआवश्यक असेल तेव्हाच प्रकरणांना स्थगिती मागावी. प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत ते म्हणाले की, अवघ्या दोन महिन्यांत ३ हजार ६८८ प्रकरणांमध्ये स्थगितीची मागणी करण्यात आली, तर बहुतांश प्रकरणे तातडीने सुनावणीसाठीची होती. आम्ही न्यायालयांना तारीख पे तारीख देणाऱ्या कार्यपद्धतीचे होऊ देणार नाही. इतकी प्रकरणे जर दीर्घ काळ प्रलंबित राहत असतील तर ते न्यायालयाच्या प्रतिमेसाठी चांगले नाही.

logo
marathi.freepressjournal.in