Video : "गव्हर्नमेंटकडून मदत मिळाली नाही..." राहुल गांधींनी शेअर केला शहीद अग्निवीराच्या कुटुंबियांचा व्हिडिओ

"सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मदत झाली नाही. इलेक्शन येतंय, ते येतंय, काय माहीत पैसे कधी येतील?" असं शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले.
Video : "गव्हर्नमेंटकडून मदत मिळाली नाही..." राहुल गांधींनी शेअर केला शहीद अग्निवीराच्या कुटुंबियांचा व्हिडिओ

नवी दिल्ली: सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं होतं. यादरम्यान अग्निवीर योजनेतील त्रुटींवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. एखादा अग्निवीर शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहिद अग्निवीरांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी एका शहिद अग्निवाराच्या कुटुंबियांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला केंद्र सरकारकडून कोणतेही पैसे मिळाले नाहीत, असं शहिद अग्निवीराच्या वडिलांनी सांगितलं आहे.

राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत नेमकं काय?

राहुल गांधी म्हणाले की, "नमस्कार, संसदेमध्ये भाषणात मी म्हटलं होतं, सत्याची रक्षा करणं प्रत्येक धर्माचा पाया आहे. त्यावर राजनाथ सिंह यांनी उत्तर देताना शिवजींच्या फोटोसमोर पूर्ण देशाला, देशाच्या सैन्याला आणि अग्निवीरांना आर्थिक मदतीविषयी खोटं सांगितलं. मी भाषणात म्हटलं होतं. माझं ऐकू नका आणि त्यांचंही ऐकू नका, अग्निवीरांचे कुटुंबिय काय म्हणतात, ते ऐका.."

यानंतर राहुल गांधींनी शहीद अग्निवीर अजय सिंह यांच्या वडिलांचा व्हिडिओ जोडला आहे, ज्यात शहिद अग्निवीराचे वडील म्हणतात, "आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाहीये. पंजाब सरकारनं आम्हाला मदत केली, पण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मदत झाली नाही. पैसै येतील, इलेक्शन येतंय, ते येतंय, काय माहीत कधी येतील?"

व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यात राहुल गांधी पुन्हा म्हणतात, "शहीद अजय सिंह यांच्या वडिलांनी माझं आणि संरक्षण मंत्र्यांचं भाषण ऐकलं त्यांनंतर ते काय म्हणाले ऐका..."

शहीद अग्निवीर अजय सिंह यांचे व्हिडिओमध्ये म्हणाले की, "राजनाथजींनी काल म्हटलं की १ कोटी रुपये कुटुंबियांना मिळाले आहेत. आम्हाला कोणताही संदेश मिळालेला नाही, आजपर्यंत कोणतेही पैसे आलेले नाहीत. राहुल गांधी संसद सदनात आवाज उठवत आहेत. शहीदांच्या कुटुंबियांना पूर्ण साहाय्यता मिळायला हवी. अग्निवीर योजना बंद व्हायला हवी. रेग्युलर भरती व्हायला हवी."

व्हिडिओच्या शेवटी राहुल गांधी म्हणाले की, "संरक्षणमंत्र्यांनी संसदेत शहिद अजय सिंह यांच्या कुटुंबियाशी, अग्निवीरांशी, सैन्याशी, देशातील युवकांशी खोटे बोललेला आहात. तुम्ही या सर्वांची माफी मागितली आहे. घाबरू नका, भीती दाखवू नका, सत्यमेव जयते."

कॅप्शनही चर्चेत...

सत्याचे रक्षण हाच प्रत्येक धर्माचा आधार आहे! परंतु संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहीद अग्निवीरांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याबाबत संसदेत खोटे बोलले. शहीद अग्निवीर अजय सिंह यांच्या वडिलांनी स्वतः त्यांच्या सत्य सांगितले आहे. संरक्षणमंत्र्यांनी संसद, देश, लष्कर आणि शहीद अग्निवीर अजय सिंह यांच्या कुटुंबाची माफी मागावी.

logo
marathi.freepressjournal.in