बंगळुरू : कर्नाटकात राहणाऱ्या नागरिकांनी कन्नड भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. यासाठी राज्यातील प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलले पाहिजे, इतर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, असे फर्मानच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या नाददेवी भुवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेबाबत आपली आपुलकी व्यक्त केली.
ते म्हणाले की, कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी. कन्नड लोक उदार असल्यामुळेच आता अन्य भाषा बोलून आपण कर्नाटकमध्ये राहू शकतो, असे सर्वांना वाटत आहे. मात्र, हीच परिस्थिती तुम्हाला तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा केरळात दिसणार नाही. या राज्यात तुम्हाला त्यांच्या मातृभाषेत संवाद साधावा लागतो. त्यामुळे आपणही आपल्याच मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात कन्नड भाषेचे वातावरण निर्माण करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या सर्वांनीच कन्नडमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भाषेला तुम्ही आपलेसे केले पाहिजे. कन्नड भाषेबरोबरच आपला देश, आपली भूमी याबद्दलही प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात मराठी भाषेची दैना उडालेली असतानाच कर्नाटक मात्र त्यांची भाषा जतन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कर्नाटकने अनेकदा मातृभाषेसाठी आग्रह धरला आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांनी कन्नडमध्येच व्यवहार करावेत, यासाठीही अनेकदा तिथे संघर्ष उडालेला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नडिगांसाठी केलेल्या आवाहनामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.