
नवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची कोणतीही योजना नाही किंवा तसा विचारही नाही, असे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी पौडी गढवाल येथील भाजप खासदार त्रिवेंद्र यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
भारतीय संविधानाच्या कलम २४६ (३) अंतर्गत, केंद्र आणि राज्यांमधील कायदेविषयक अधिकारांच्या विभाजनानुसार, प्राण्यांचे संरक्षण हा एक असा विषय आहे, ज्यावर राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा विशेष अधिकार आहे, असे बघेल यांनी सांगितले.
केंद्र सरकारने डिसेंबर २०१४ पासून ‘राष्ट्रीय गोकुळ’ अभियान राबवले आहे. जेणेकरून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गायींच्या संवर्धन आणि संगोपनासाठी उचललेल्या पावलांना पाठिंबा मिळेल.
एकूण दूध उत्पादनात गाईचे दूध ५३.१२ टक्के
२०२४ मध्ये देशातील एकूण २३९.३० दशलक्ष टन दूध उत्पादनात गाईच्या दुधाचे योगदान ५३.१२ टक्के होते, तर म्हशीच्या दुधाचे योगदान ४३.६२ टक्के होते, अशी माहितीही यावेळी बघेल यांनी दिली.