केजरीवालांना विशेष सूट दिलेली नाही! सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करताना कोणतीही विशेष सूट देण्यात आलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
केजरीवालांना विशेष सूट दिलेली नाही! सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करताना कोणतीही विशेष सूट देण्यात आलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. या निर्णयावर टीकात्मक विश्लेषण करण्यात येत असून आम्ही त्याचे स्वागतच करतो, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर जी वक्तव्ये करण्यात आली, त्याबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केजरीवाल यांच्या वकिलांनी केलेले दावे-प्रतिदावे यांची दखल घेण्यास न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्त यांनी नकार दिला. आम्ही कोणासाठीही कोणताही अपवाद केलेला नाही. आम्ही आमच्या आदेशात आम्हाला वाटले ते नमूद केले असून ते समर्थनीय आहे, असेही पीठाने म्हटले आहे.

कोर्टाने केजरीवाल यांना विशेष सूट दिली आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच केले. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना कोणतीही विशेष सूट देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केल्याने तो शहा यांना एकप्रकारे टोला असल्याचे मानण्यात येते.

जनतेने जर ‘आप’ला मतदान केले, तर २ जून रोजी आपल्याला कारागृहात परतावे लागणार नाही, असे वक्तव्य केजरीवाल यांनी निवडणूक जाहीरसभेत केले. त्याला ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हरकत घेतली. मात्र, असे केजरीवाल यांनी गृहित धरले आहे, आम्ही त्यावर भाष्य करू शकत नाही, असे पीठाने सांगितले.

न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद फेटाळला

केजरीवाल यांनी कारागृहात पुन्हा कधी परत यावयाचे आहे ते आमच्या आदेशात स्पष्ट आहे, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. केजरीवाल यांनी जामिनाच्या अटीचे उल्लंघन केले आहे, असा आरोप मेहता यांनी केला. केजरीवाल यांना काय सूचित करावयाचे आहे? ही संस्थेला लगावलेली थप्पड आहे असे वाटते, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. मात्र, खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. २ जून रोजी केजरीवाल यांना कारागृहात परत यावयाचे आहे आमचे आदेश स्पष्ट आहेत, असे न्या. खन्ना म्हणाले.

केजरीवाल, आपविरुद्ध ईडी आरोपपत्र दाखल करणार

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ‘आप’विरुद्ध लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. केजरीवाल आणि आपविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे, असे ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्त यांच्या पीठासमोर सांगितले. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ईडीने वरील माहिती दिली

logo
marathi.freepressjournal.in