फ्रेंच लेखिका ॲनी यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक

स्टॉकहोम, स्वीडन येथे नोबेल पारितोषिक सप्ताहाच्या चौथ्या दिवशी साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली
फ्रेंच लेखिका ॲनी यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक

यंदाचे साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक फ्रेंच लेखिका अ‍ॅनी एर्नोक्स यांना जाहीर करण्यात आले आहे. अ‍ॅनी यांनी अतिशय सोप्या भाषेत गंभीर विषयांवर लिहले आहे. त्यांच्या लिखाणात धैर्याबरोबरच धाडसही आहे. प्रत्येक वर्गाचा त्यांनी आपल्या लेखनात समावेश केला, असे नोबेलच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. स्टॉकहोम, स्वीडन येथे नोबेल पारितोषिक सप्ताहाच्या चौथ्या दिवशी साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

८२ वर्षीय अ‍ॅनी यांनी सुमारे ४० पुस्तके लिहिली आहेत. यापैकी ९० टक्के पुस्तके ही फ्रेंच भाषेत आहेत. त्यापैकी काहींचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. यामध्ये पॅशन सिंपल, ला पॅलेस, द इयर्स, अ फ्रोझन वुमन, हॅपनिंग्स आणि डू व्हॉट ऑर द एल्स या पुस्तकांचा समावेश आहे.

ॲनी यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी झाला असून त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचे साहित्यिक कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे.

स्वीडनचे अनुवंशशास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी भौतिकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. अॅलेन आस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉसर आणि अँटोन जेलिंगर अशी त्यांची नावे आहेत. तर बुधवारी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅरोलिन बर्टोझी, डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाचे मॉर्टन मेडेल आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्क्रिप्स रिसर्चचे बॅरी शार्पलेस या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झाले. आता शुक्रवारी या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार १० ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in