ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना उमेदवारी नाराजी दूर करण्यात भाजप श्रेष्ठींना यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ग्वाल्हेर येथे एका कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंधिया यांचे तोंडभरून कौतुक केले
ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना उमेदवारी 
नाराजी दूर करण्यात भाजप श्रेष्ठींना यश

नवी दिल्ली : आपल्या समर्थकांना उमेदवारी न दिल्याने अस्वस्थ असलेल्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलासा मिळाला आहे. भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या मध्य प्रदेशमधील उमदेवारांच्या पाचव्या यादीत ज्योतिरादित्य यांच्या २५ पैकी १८ निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात १० मंत्री, पाच आमदारांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ग्वाल्हेर येथे एका कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंधिया यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांना ‘गुजरातचा जावई’ असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सिंधियांवर कौतुकाचा वर्षाव केला. तत्पुर्वीच ज्योतिरादित्य यांच्या निष्ठावंतांना उमेदवारी दिल्याने ज्योतिरादित्य हेदेखील या कार्यक्रमात खूश दिसत होते. महिन्याभरापासून सिंधिया गटाचे राज्यातील भाजप नेतृत्वाशी मतभेद चालू होते. २०२० साली सत्ताधारी काँग्रेसमधून बाहेर पडत सिंधिया यांच्या निकटवर्तीय आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून मुळच्या भाजपच्या नेत्यांसह सिंधिया गटाचे वाद चालू होते. सिंधिया यांचा गट भाजपमध्ये सामील झाल्यामुळे काँग्रेसचे सरकार पडून भाजपचे सरकार स्थापन झाले, तरीही भाजपमधील काही नेते सिंधिया गटाला स्वीकारण्यास तयार नव्हते, ही खदखद सिंधिया गटात होती. त्यातच मध्य प्रदेश विधानसभेच्या पहिल्या चार याद्यांमध्ये त्यांना स्थान न मिळाल्याने नाराजी आणखी गडद झाली होती.

बुधवारी भाजपने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली, यात सिंधिया यांच्या २५ निष्ठावंतांपैकी विद्यमान १८ आमदारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यात ऊर्जा मत्री प्रद्युम्न सिंह तोमर (ग्वाल्हेर), जलसंपदा मंत्री तुलसी सिलावत (सानवेर, इंदूर), औद्योगिक धोरण आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री राजवर्धन सिंह दत्तीगाव (बडनावार, धार), सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रभुराम चौधरी (सांची, रायसेन), महसूल मंत्री गोविंद सिंह राजपूत (सुरखी, सागर), अन्न मंत्री बिसाहुलाल सिंह (अनुपपूर), पर्यावरण मंत्री हरदीप सिंह डांग (सुवासरा, मनसौर), पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया (बामोरी, गुना), एमपी राज्य नागरी पुरवठा महामंडळाचे अध्यक्ष प्रद्युम्न सिंह लोधी (मल्हारा, छतरपूर) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुरेश धाकड (पोहारी, शिवपुरी) या मंत्र्यांचा भाजपच्या यादीत समावेश आहे. जयपाल सिंह जज्जी (अशोक नगर), कमलेश जाटव (अंबाह, मुरैना), ब्रजेद्र सिंह यादव (मुंगौली, अशोक नगर), मनोज चौधरी (हातपिपिलिया, देवास) आणि नारायण पटेल (मांधाता, निमाड) या पाच निष्ठावंत आमदारांनाही भाजपने तिकीट दिले आहे.

भाजपने आपल्या जुन्या-जाणत्या नेत्यांची नाराजी पत्करत २०२० सालच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या सिंधिया यांच्या तीन निष्ठावंतांनाही पुन्हा तिकीट दिले आहे. यात माजी महिला व बाल विकास मंत्री इमरती देवी (डबरा, ग्वाल्हेर), अदल सिंह कंसाना (सुमावली, मुरैना) आणि रघुराज सिंह कंसाना (मुरैना) या तीन आमदारांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in