उत्तर भारतात पूराचे थैमान! यमुनेला पूर, पंजाबमधील २३ जिल्हे पूरग्रस्त घोषित; राहुल गांधी यांची पॅकेजची मागणी

जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीला पावसाच्या या रौद्रावताराचा चांगलाच फटका बसला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली ते अगदी जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये प्रामुख्यानं पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसामुळे स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर भारतात पूराचे थैमान! यमुनेला पूर, पंजाबमधील २३ जिल्हे पूरग्रस्त घोषित; राहुल गांधी यांची पॅकेजची मागणी
Published on

नवी दिल्ली : पावसाने उत्तरेकडील राज्यांमध्ये थैमान घातले असून पुढील काही आठवडे पावसाचे प्रमाण धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीला पावसाच्या या रौद्रावताराचा चांगलाच फटका बसला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली ते अगदी जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये प्रामुख्यानं पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसामुळे स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

केंद्रीय जलआयोगाच्या पूर्वानुमानानुसार दिल्ली रेल्वे ब्रिज (नॉर्थ डिस्ट्रीक्ट) इथे यमुना इशारा पातळीवर वाहत आहे, ज्यामुळे येथील बहुतांश भाग जलमय झाले असून सद्यस्थितीला दिल्लीत १५ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी (२०५.३३ मीटर) ओलांडली असून, बुधवारी सकाळी ती २०६.३६ मीटरवर होती, जी २०२३ मधील २०८.६६ मीटरच्या विक्रमी पातळीपासून फक्त २.३ मीटर कमी आहे. यमुना बाजार, मयूर विहारसारख्या भागांत पाणी शिरल्याने १५,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हिमाचलमध्ये सातत्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पंजाबमधील २३ जिल्हे पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. भाखडा कालव्यातील जलस्तर १६७७ फुटांवर असून, या भागातील अनेक गावांना संभाव्य धोका पाहता नागरितांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पंजाबच्या सर्व २३ जिल्ह्यांतील १४०० हून अधिक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता, पंजाब सरकारने संपूर्ण राज्य आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यासह सर्व शैक्षणिक संस्था ७ सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. राज्यात पुरामुळे आतापर्यंत तीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्थानिक प्रशासन आणि सैन्य मदत कार्यात गुंतले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील परिस्थिती पाहता अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ६ हजार कोटी रुपयांची आपत्कालीन मदत मागितली आहे. पंजाब पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीत देण्याचे ठरवले आहे.

जम्मू कश्मिरमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे उत्तर रेल्वेने ३० सप्टेंबरपर्यंत जम्मू आणि कटरा स्थानकांवरून जाणाऱ्या आणि जाणाऱ्या ६८ गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारपासून जम्मू प्रदेशात मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोक, विशेषतः यात्रेकरू अडकले आहेत. कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात ३४ जणांचा मृत्यू झाला. बुधवारपर्यंत जम्मू प्रदेशात ३८० मिमी पाऊस पडला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि कटरा दरम्यान अडकलेल्या स्थानिक लोक आणि प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी तीन गाड्यांसह शटल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात अधूनमधून पाऊस पडला. त्यांनी सांगितले की बहुतेक भागात पावसाची तीव्रता हलक्या ते मध्यम स्वरूपाची होती, तर दक्षिण काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला.

दिल्लीमध्ये यमुना कोपली

दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी (२०५.३३ मीटर) ओलांडली असून, बुधवारी सकाळी ती २०६.३६ मीटरवर होती, जी २०२३ मधील २०८.६६ मीटरच्या विक्रमी पातळीपासून फक्त २.३ मीटर कमी आहे. यमुना बाजार, मयूर विहारसारख्या भागांत पाणी शिरल्याने १५,०००0 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

राहुल यांची पॅकेजची मागणी

पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये पावसाने कहर केला आहे. त्यामुळे या राज्यांना पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच इथे बचाव कार्यांना गती द्यावी असेही राहुल गांधी म्हणाले. एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी, पंजाबमध्ये पुरामुळे भीषण हाहाकार माजला आहे. जम्मू-कश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्येही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

logo
marathi.freepressjournal.in