

उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली आहे. उत्तर कोरियाने आठवडाभरात पाचव्यांदा क्षेपणास्त्र चाचणी केली. २०१७नंतर जपानवरून गेलेले हे उत्तर कोरियाचे पहिलेच क्षेपणास्त्र आहे.
हे क्षेपणास्त्र जपानपासून सुमारे तीन हजार किमी पॅसिफिक महासागरात पडले. उत्तर कोरियाच्या या कारवाईनंतर जपानमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती मिळाल्यानंतर जपान सरकारने सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेनंतर जपानने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावत होक्काइदो बेटावरील लोकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यासोबतच अनेक वाहनांचे संचालन तात्पुरते थांबवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक आणि अण्वस्त्रांच्या चाचणीवर बंदी घातली आहे. असे असतानाही क्षेपणास्त्राच्या चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. यापूर्वी मे महिन्यातही क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली होती.