
काँग्रेसमधील अंतर्गत कलह सुरूच असून, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आता वजनदार नेते आनंद शर्मा यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केली. आनंद शर्मा यांनी रविवारी सोनिया गांधींना पत्र लिहून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
“पक्षाच्या कोणत्याही बैठकीला बोलावले न गेल्याने माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. पक्षात त्यांची उपेक्षा केली जात आहे,” असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते शर्मा यांची २६ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशातील सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. हिमाचल विधानसभेच्या निवडणुका या वर्षअखेरीस होणार असल्याने भाजपकडून सत्ता काबीज करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. शर्मा हे हिमाचल प्रदेशातील सर्वात प्रभावी नेत्यांमध्ये गणले जातात.