धमन्यांमधून रक्त नव्हे, गरम सिंदूर वाहतेय! पंतप्रधानांचा पाकला पुन्हा इशारा

बिकानेर येथील जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर जोरदार टीका केली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले. पहलगाम येथे निष्पापांवर गोळ्या झाडल्या गेल्या. पण त्या गोळ्या १४० कोटी भारतीयांना लागल्या.
धमन्यांमधून रक्त नव्हे, गरम सिंदूर वाहतेय! पंतप्रधानांचा पाकला पुन्हा इशारा
Published on

बिकानेर : जेव्हा ‘सिंदूर’ दारुगोळा होतो तेव्हा काय परिणाम होतात याची जगाला प्रचिती आली आहे. इतकेच नव्हे, तर देशाच्या शत्रूलाही त्याची चांगलीच जाणीव झाली आहे. आपल्या धमन्यांमधून रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे, असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला.

बिकानेर येथील जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर जोरदार टीका केली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले. पहलगाम येथे निष्पापांवर गोळ्या झाडल्या गेल्या. पण त्या गोळ्या १४० कोटी भारतीयांना लागल्या. यानंतर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला होता की, दहशतवादाला मातीत गाडले जावे. आम्ही तीनही दलांना मोकळीक दिली आणि त्यांनी असा चक्रव्यूह रचला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यासाठीच दहशतवाद

मोदी पुढे म्हणाले की, भारत शांत राहील, असा जे विचार करत होते, आज ते घरात लपून बसले आहेत. जे स्वतःच्या शस्त्रावर गर्व करत होते, ते आज कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पाकिस्तानवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तान भारताशी थेट लढाई कधीच जिंकू शकत नाही. जेव्हा जेव्हा थेट लढाई झाली, तेव्हा तेव्हा ते तोंडावर आपटले. यासाठीच ते भारताविरोधात दहशतवादाचा शस्त्राप्रमाणे वापर करतात.

सिंदूर जेव्हा दारुगोळा बनतो

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर दारुगोळा होतो तेव्हा काय परिणाम साधतो, हे आता जगाने आणि देशाच्या शत्रूनेही पाहिले आहे. हवाई हल्ल्यानंतर आपण येथे आलो होतो तेव्हाच म्हणालो होतो की, या मातीची शपथ आहे, देशाची मान झुकू देणार नाही. आज राजस्थानच्या भूमीमधून देशातील नागरिकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, जे लोक कुंकू (सिंदूर) पुसायला निघाले होते त्यांना आम्ही मातीत गाडले. जे भारताचे रक्त सांडत होते, त्यांच्याकडून रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला आहे, असेही मोदी म्हणाले.

नो ट्रेड, नो टॉक्स, आता फक्त पीओकेवर चर्चा

नो ट्रेड, नो टॉक्स, आता फक्त पीओकेवर चर्चा होईल, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सुटेपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची व्यापारी चर्चा होणार नाही. एवढेच नाही तर सिंधू पाणी कराराचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, भारताच्या हक्काचे पाणी पाकिस्तानला मिळणार नाही.

मस्तिष्क शांत

स्वातंत्र्यप्राप्तीपासून कित्येक दशके हेच सुरू होते. पाकिस्तान दहशतवाद पसरवून निर्दोष लोकांचे बळी घेत होता. पण पाकिस्तान हे विसरला की, भारताचा सेवक मोदी इथे छातीठोकपणे उभा आहे. मोदीचे मस्तिष्क शांत असले तरी मोदीचे रक्त उसळत आहे. आता तर मोदीच्या धमन्यांतून रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

‘अमृतभारत’ योजनेंतर्गत १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन

‘अमृतभारत’ योजनेंतर्गत देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी झाले. यात रेल्वेच्या नागपूर विभागातील नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी, चांदा फोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in