कॉंग्रेसकडून निवडणुकीसाठी ‘जनता जाहीरनामा’ वेबसाईटवरुन जनतेच्या सूचना मागवल्या

पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील जाहीरनामा समितीने बुधवारी जाहीरनाम्याबाबत जनतेची मते जाणून घेण्यासाठी एक वेबसार्इट सुरु करुन इमेल आयडी जाहीर केला.
कॉंग्रेसकडून निवडणुकीसाठी ‘जनता जाहीरनामा’ वेबसाईटवरुन जनतेच्या सूचना मागवल्या

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर करतांना कॉंग्रेस जनतेच्या दारी गेली आहे. पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील जाहीरनामा समितीने बुधवारी जाहीरनाम्याबाबत जनतेची मते जाणून घेण्यासाठी एक वेबसार्इट सुरु करुन इमेल आयडी जाहीर केला.

या बाबत बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम म्हणाले की कॉंग्रेस आपल्या जाहिरनाम्यासाठी जनतेशी सल्लामसलत करुन जनतेची मते विचारात घेणार आहे. आगामी लोकसभेसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा हा जनतेचा जाहिरनामा असेल. जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या वेबसार्इटच्या माध्यमातून अधिकाधिक मते मागवून घेण्यात येणार आहेत. आता काही आठवडेच शिल्लक आहेत तरी देखील वेगाने काम करण्यात येणार आहे. आमच्या जाहिरनामा तयार करण्याच्या कामात जनता सहभागी व्हावी अशी आमची इच्छा आहे. समाजातील सर्व थरांतील लोक आम्हांला सूचना देतील अशी आमची अपेक्षा आहे. प्रत्येक राज्यातून किमान एक सूचना जाहिरनाम्यासाठी स्विकारण्यात येणार आहे. काही राज्यात एकापेक्षा अधिक सूचना देखील स्विकारल्या जाउ शकतील असे माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी पत्रकारांना सांगितले. जाहिरनाम्याविषयी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सल्लामसलत करणार का असा प्रश्न विचारला असता चिदंबरम म्हणाले की कुणी सूचना करीत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करु. मात्र जाहिरनाम्याविषयी घटक पक्षांसोबत चर्चा करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. जर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना सल्लामसलतीत सामील व्हायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र उच्च पातळीवरील सल्लामसलत बाबत कॉंग्रेस अध्यक्षच निर्णय घेतील. दरम्यान कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी याविषयीच्या सूचना आवाजभारतकी डॉट इन या संकेतस्थळावर द्याव्यात असे आवाहन केले आहे. तसेच सूचना पाठवण्यासाठी इमेल देखील संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in