
मुंबई : २०११ साली झालेल्या दरोडा प्रकरणी गेल्या १४ वर्षांपासून फरार असलेल्या आनंद हनुमंता संगी या कुख्यात गुन्हेगाराला अखेर डी बी मार्ग पोलिसांनी तेलंगणातील यादाद्री जिल्ह्यातून अटक केली. ही कारवाई मुंबई पोलिसांनी आखलेल्या मोहिमेमुळे यशस्वी झाली.
२०११ मध्ये डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून संगी फरार होता. तसेच वर्षभरापूर्वी मीरा-भाईंदर येथे लावलेल्या सापळ्यातूनही तो बचावला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीने आपल्या ओळखीतील सर्व व्यक्तींशी संपर्क तोडला होता, त्यामुळे त्याला शोधणे अधिक कठीण झाले होते. मात्र मागील महिन्यात मिळालेल्या गुप्त माहितीतून संगी तेलंगणातील मारीयाला गावाजवळ राहत असल्याचे समोर आले. लगेच डी बी मार्ग पोलिसांचे पथक तिथे पाठवण्यात आले.
तपासात उघड झाले की संगी हा तेथील जंगल भागात राहत होता आणि त्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत एक घर मिळवले होते. ही माहिती मिळताच पोलिस स्वत:ला गृहनिर्माण योजनेचे अधिकारी म्हणून त्याच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तब्बल १४ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला अटक करण्यात यश आल्याने मुंबई पोलिसांच्या या कामगिरीवर अनेकांनी कौतुक केले आहे.
गुन्ह्याची कबुली
चौकशीदरम्यान संगीने २०११ च्या दरोड्याच्या प्रयत्नातील सहभागाची कबुली दिली. त्याला अटक करून गिरगाव न्यायालय येथे हजर करण्यात आले.