लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता 'या' पदार्थांचा आस्वाद घेता येणार

स्थानिक खाद्यपदार्थांचे दर हे सध्या उपलब्ध असलेल्या दरांमध्येच ठेवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली आहे
File
File

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत प्रवासाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘आयआरसीटीसी’ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक चविष्ट, रुचकर खाद्यपदार्थांचा रेल्वेच्या आहारामध्ये समावेश करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला असून त्यानुसार आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाने स्थानिक खाद्यपदार्थांचा प्रस्ताव तयार केला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात लंच प्रवास करताना प्रवाशांना वडापाव, श्रीखंडपुरी, पुरणपोळी तसेच खमण ढोकळा, राजस्थानी डालबाटी अशा पदार्थांचा आनंद लुटता येणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश ही पश्चिम विभागातील राज्ये आयआरसीटीसीच्या सेवांतर्गत आहेत. भारतीय रेल्वे मंडळाने राज्यातील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक खाद्यपदार्थांचा रेल्वे मेन्यूमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील आयआरसीटीसीच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून स्थानिक खाद्यपदार्थांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. देशभरातील सर्व खाद्यपदार्थांच्या प्रस्तावावर एकत्रित निर्णय घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक खाद्यपदार्थांचे दर हे सध्या उपलब्ध असलेल्या दरांमध्येच ठेवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली आहे. संबंधित आयआरसीटीसी क्षेत्रीय कार्यालयाकडून मार्च २०२३ पर्यंत मंजूर केलेले खाद्यपदार्थ रेल्वेगाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

या स्थानिक खाद्यपदार्थांचा समावेश असणार

वडापाव, श्रीखंडपुरी, पुरणपोळी, कोथिंबिरवडी, अळुवडी, कांदेपोहे यांसह स्थानिक ओळख असलेले खाद्यपदार्थ प्रवासात उपलब्ध होणार आहेत. मांसाहारी खाद्यांची आवड असलेल्या खवय्यांसाठी अस्सल कोकणी चिकन सुकाचा पर्यायही प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. तर गुजराती खमण ढोकळा, सुरती उंधिंयू, राजस्थानी डालबाटी, मलई घेवर आणि मध्य प्रदेशमधील पालकपुरी, दाल बाफला अशा पदार्थाचा पर्याय ही देण्यात येणार असून राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मराठवाडा या विभागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in