आता ‘पॅलेस ऑन व्हील्स’वर सनई-चौघडे वाजणार! राजेशाही थाटात लग्नाचे स्वप्न पूर्ण होणार

‘पॅलेस ऑन व्हील्स’ ही रेल्वेची आलिशान व राजेशाही थाट असलेली विशेष ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये लग्न करण्यास व लग्नापूर्वी-लग्नानंतर फोटो शूटिंगला राज्य सरकारकडून मान्यता
आता ‘पॅलेस ऑन व्हील्स’वर सनई-चौघडे वाजणार! राजेशाही थाटात लग्नाचे स्वप्न पूर्ण होणार

जयपूर : ‘पॅलेस ऑन व्हील्स’ ही रेल्वेची आलिशान व राजेशाही थाट असलेली विशेष ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये लग्न करण्यास व लग्नापूर्वी-लग्नानंतर फोटो शूटिंगला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सध्या राजस्थान हे विवाहासाठी खास आकर्षण आहे. अनेक नामवंत व्यक्तीचे विवाह हे राजस्थानला झाले आहेत. आता राजस्थानात ‘पॅलेस ऑन व्हील्स’मध्ये लग्न करायला मिळणार आहे.

राजस्थान सरकारच्या उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्री दिया कुमारी यांनी सांगितले की, ‘पॅलेस ऑन व्हील्स’मुळे डेस्टिनेशन वेडिंगला मोठी चालना मिळेल. तसेच परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतात. ‘पॅलेस ऑन व्हील्स’चे लग्नासाठीचे भाडे किती असेल, त्याचे पॅकेज किती दिवसांचे असेल, हे अद्यापही ठरलेले नाही. ‘पॅलेस ऑन व्हील्स’ ही जगातील सर्वात सुंदर व लक्झरियस ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाल्यास दाम्पत्याला आयुष्यभर त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. पर्यटक हे भारत व राजस्थानचे सदिच्छादूत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील, असे दिया कुमारी यांनी सांगितले.पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेच्या पॅकेजची घोषणा लवकरच केली जाईल. येत्या उन्हाळ्यापासून ही सेवा उपलब्ध होऊ शकते.

देशातील ७५ टक्के हेरिटेज मालमत्ता राजस्थानात आहेत. जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि अन्य जिल्ह्यांत किल्ले, हवेली, मॅन्शन आहेत. देशा-परदेशातील पर्यटकांना ते आकर्षित करतात.

logo
marathi.freepressjournal.in