आता भारतीय महिलेने केली ‘सीमा’ पार

प्रियकरासाठी गाठले थेट पाकिस्तान
आता भारतीय महिलेने केली ‘सीमा’ पार

जयपूर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानातील भिवाडी येथील एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. संबंधित महिलेचे नाव अंजू असून, २१ जुलै रोजी ती भिवाडी येथून फेसबुक मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. आपल्या पतीला काहीही न सांगता ती गुपचूप पाकिस्तानात गेली. याबाबतची माहिती मिळताच तिच्या पतीला धक्का बसला आहे.

पाकिस्तानात गेलेल्या अंजूने नंतर ‘राजस्थान तक’शी संवाद साधला. तसेच पुढील दोन-चार दिवसांत मी पुन्हा भारतात येणार आहे, असे तिने सांगितले. तसेच मी पाकिस्तानात आपल्या फेसबुकवरील मित्राला भेटण्यासाठी आणि एका लग्नासाठी आले आहे. आपण पाकिस्तानातील पेशावरजवळील दीर अपर परिसरात सुरक्षित आहोत, असेही तिने सांगितले.

“पाकिस्तानात माझा एक मित्र आहे. त्याच्या कुटुंबीयांशी माझे चांगले बोलणे होते. आम्ही दोन वर्षांपूर्वी मित्र बनलो होतो. मी एका लग्नासाठी इथे आले आहे, पण हे ठिकाण चांगले असल्याने मी फिरायलाही आले. सीमा हैदरशी माझी तुलना करणे योग्य नाही. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि मी इथे सुरक्षित आहे. मी पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न करण्याच्या हेतूने आले नाही. लग्नाच्या सुरुवातीपासून माझे आणि माझ्या पतीचे फारसे जमत नाही. मी मजबुरी म्हणून पतीबरोबर राहत होते, पण आता भारतात आल्यानंतर मी पतीशी विभक्त होऊन माझ्या मुलांबरोबर एकटी राहणार आहे,” असेही अंजूने सांगितले.

व्हिसा असल्याने कारवाई टळली

सीमा हैदर अवैधमार्गे भारतात आली होती. कोणत्याही कागदपत्राशिवाय तिने भारतात वास्तव्य केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु, अंजूकडे व्हिसा आहे. त्यामुळे तिला पाकिस्तानात अधिकृत प्रवेश मिळाला. ती वाघामार्गे पाकिस्तानात आली आणि इस्लामाबादला गेली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in