
नवी दिल्ली : निवृत्तीधारकांसाठी असलेली नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) ही योजना अधिक आकर्षक केली आहे. या योजनेत खासगी भागधारकांना १०० टक्के समभागात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विविध योजना आराखडा व पैसे काढण्याबाबत सवलती देण्यात आल्या आहेत.
एनपीएसमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक मोठे बदल झाले. त्यात समभागांचे नियम, कर दायित्व आणि पैसे काढण्याची मार्गदर्शक तत्त्वे आदींचा समावेश होता.
सध्या एनपीएसमध्ये समभागात मर्यादा ७५ टक्के आहे. पण उद्यापासून सरकारी कर्मचारी सोडून सर्व भागधारकांना १०० टक्के रक्कम शेअर बाजारात (इक्विटी) गुंतवू शकतील. दीर्घ मुदतीसाठी इक्विटी गुंतवणुकीने नेहमीच चांगले परतावे दिले आहेत. त्यामुळे ज्यांना जास्त परतावा हवा असेल आणि शेअर बाजाराचा धोका घ्यायची तयारी आहे, त्यांना याचा फायदा होईल.
आतापर्यंत एका ‘पीआरएएन’ (प्रान) वर फक्त एकच स्कीम चालवता येत होती. पण आता मल्टिपल स्कीम फ्रेमवर्कमुळे गुंतवणूकदार एका ‘प्रान’ वर वेगवेगळ्या संस्थांच्या स्कीम्स निवडू शकतील. यामुळे अधिक पर्याय आणि लवचिकता मिळेल. पेन्शन फंड मॅनेजर्स वय, प्रोफेशन किंवा रिस्क घेण्याची क्षमता पाहून कस्टमाइज्ड स्कीम आणू शकतील.
-१५ वर्षांनंतर एक्झिट : आधी एक्झिट साधारणपणे निवृत्तीनंतर (६० वर्षे) शक्य होते. आता १५ वर्षे पूर्ण झाल्यावरही स्कीममधून बाहेर पडता येईल.
-एकाचवेळी पैसे काढणे : पैसे काढताना ४०% रक्कम पेन्शनसाठी गुंतवणे बंधनकारक होते. आता ती मर्यादा २०% केली जाणार आहे. म्हणजे गुंतवणूकदार ८०% रक्कम रोख स्वरूपात काढू शकतील.
-लहान निधीसाठी सवलत : ४ लाख रुपयांपर्यंतचा संपूर्ण निधी एकाचवेळी काढता येईल (पूर्वी मर्यादा २.५ लाख होती).
-अंशत: पैसे काढणे : पूर्वी फक्त ३ वेळा पैसे काढता येत होते, आता ६ वेळा काढता येतील, मात्र प्रत्येक विदड्रॉलमध्ये किमान ४ वर्षांचे अंतर असणे आवश्यक आहे.