
जोडादाराची सहमती नसताना अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे हा भादंवि कलम ३७७ अन्वये गुन्हाच आहे. असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. ठाण्यातील एका प्रकरणात प्रेयसीने अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकर वैमानिकाने साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडले. त्यामुळे प्रेयसीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या प्रकरणात न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी अर्जदार वैमानिकाला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार देत मोठा झटका दिला.
आरोपी वैमानिक व प्रेयसीचा साखरपुडा झाला होता. तथापि, प्रेयसीने अनैसर्गिक संबंध ठेवण्याची वैमानिकाची इच्छा धुडकावल्यामुळे लग्न मोडले. अखेर प्रेयसी तरुणीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात वैमानिक व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वैमानिकाच्या कुटुंबीयांना याआधी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर करताना आरोपी वैमानिकाचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात आरोपी वैमानिकाने उच्च न्यायालयात धाव घेत अटक पूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पती-पत्नी यांच्यातील नाते आणि शरीर संबंधाबाबत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविली.
आरोपी वैमानिक व त्याची प्रेयसी या दोघांनी प्रेमसंबंधात असताना व्हॉट्सअॅपवर केवळ अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रांची देवाणघेवाण केलेली नाही, तर लैंगिक संबंधांबद्दलही स्वारस्य दाखवले होते. त्यामुळे या प्रकरणात भादंवि कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दिसून येते. त्यामुळे अनैसर्गिक संबंधाच्या प्रत्येक पैलूचा तपास करण्याचा अधिकार पोलिसांना असून, आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असे स्पष्ट करत अर्जदार वैमानिकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.