नवी दिल्ली : भारताला रशियन तेल किंमत मर्यादेची अंमलबजावणी कायम ठेवण्याचे आवाहन अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. त्याचा लाभ अमेरिका आणि जगभरातील ऊर्जा बाजारांना होणार असल्याचे ते मत आहे.
तेल खरेदीवर रशियाचा नफा मर्यादित ठेवण्याच्या उद्देशाने किंमत मर्यादा कायम ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी अमेरिकेचे अर्थ मंत्रालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी भारतात आले आहेत. स्थिर जागतिक ऊर्जा बाजारांना प्रोत्साहन देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादासाठी वित्तपुरवठा विरोधी विभागाचे ॲक्टिंग असिस्टंट सेक्रेटरी ॲना मॉरिस आणि आर्थिक धोरण विभागाचे पीडीओ असिस्टंट सेक्रेटरी एरिक व्हॅन नॉस्ट्रँड हे २ ते ५ एप्रिलदरम्यान भारत दौऱ्यावर आले असून ते नवी दिल्ली आणि मुंबईत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील समकक्ष अधिकाऱ्यांना भेटतील.
उभय अधिकारी महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील, ज्यात मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याला विरोध करणे, इतर बेकायदेशीर आर्थिक समस्या आणि रशियाकडून भारत करत असलेल्या तेल खरेदीवर किमती मर्यादा लागू करणे यासह प्रमुख द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होईल. स्थिर जागतिक ऊर्जा बाजारांना प्रोत्साहन देताना रशियाच्या ऊर्जा संसाधनांना बळकट करणे हा उद्देश आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दहशतवाद्यांना त्याच्या बेकायदेशीर कारवाई रोखण्यासाठी त्यांना होणारा वित्तपुरवठा आणखी मर्यादित करण्यासाठीही हा दौरा आहे, असे अमेरिकन अर्थ मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.