लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड; मोदींच्या प्रस्तावावर विरोधकांकडून मतदानाची मागणी नाही

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ असल्यासारखी स्थिती निर्माण झाली असतानाच बुधवारी रालोआचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड; मोदींच्या प्रस्तावावर विरोधकांकडून मतदानाची मागणी नाही
PTI

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ असल्यासारखी स्थिती निर्माण झाली असतानाच बुधवारी रालोआचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली. विरोधी पक्षाने काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला होता, मात्र काँग्रेसने प्रस्तावावार मतदानाची मागणी न केल्याने हंगामी अध्यक्ष भर्तृहारी माहताब यांनी बिर्ला यांच्या निवडीची घोषणा केली.

निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपाचे नेते अखिलेश यांच्यासह अनेक नेत्यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. मोदी, राहुल गांधी आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी बिर्ला यांना सन्मानपूर्व अध्यक्षांच्या आसनाकडे नेले.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला यांनी देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या निषेधाचा ठराव वाचून दाखविला. मोदी यांनी त्याबद्दल बिर्ला यांचे अभिनंदन केले, तर विरोधी पक्षांनी त्याचा निषेध केला. सभागृहात विरोधी पक्षांना जनतेचा आवाज उठविण्याची समान संधी मिळेल, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली, तर सदस्यांच्या निलंबनाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी अपेक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ‘बिर्ला यांनी आणीबाणीचा निषेध केला ते पाहून आपल्याला आनंद झाला, त्यावेळी लोकशाहीचा गळा घोटण्यात आला होता. आणीबाणी ५० वर्षांपूर्वी लादण्यात आली होती, मात्र आताच्या युवकांना त्याबद्दल माहिती होणे महत्त्वाचे आहे’, असे मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. संसदपटूंना ते योग्य मार्गदर्श करतील आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते सभागृहात मोठी भूमिका बजावतील आणि पदाला नवी उंची देतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

गेल्या लोकसभेतील अध्यक्ष या नात्याने बिर्ला यांनी बजावलेली कामगिरी आणि एक उत्तम संसदपटू म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल मोदी यांनी बिर्ला यांचे कौतुक केले. मोदी यांनी २० वर्षांच्या कालावधीतील संदर्भ यावेळी दिला. यापूर्वी जे अध्यक्ष झाले त्यांनी पुढील निवडणूक लढविली नाही, तर काही जणांनी पुढील निवडणूक लढविली, परंतु ते पराभूत झाले. मात्र, बिर्ला हे निवडणूक लढवून पुन्हा एकदा निवडून आले आणि अध्यक्षपदी विराजमान होऊन त्यांनी इतिहास रचला, असेही मोदी म्हणाले.

विरोधकांकडून निषेध

अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी सभागृहात देशावर आणीबाणी लादण्याच्या घटनेचा निषेध करणारा ठराव वाचून दाखविला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तो निर्णय म्हणजे राज्यघटनेवरील हल्ला होता असे नमूद केले. बिर्ला यांनी या ठरावाचे वाचन करताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्याचा निषेध केला. नव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात सत्तारूढ आणि विरोधी सदस्य यामुळे एकमेकांसमोर उभे ठाकले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उभे राहून आणीबाणीचा संदर्भ दिल्याबद्दल घोषणाबाजी करीत निषेध केला.

विरोधकांना संधी मिळणे अपेक्षित - राहुल गांधी

सभागृहात विरोधी पक्षांना जनतेचा आवाज उठविण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले तेव्हा त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. सबागृहाचे कामकाज सुरळीत आणि नियमित चालावे ही विरोधी पक्षांची इच्छा आहे, विश्वासाने सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

सदस्यांच्या निलंबनाची पुनरावृत्ती नको ही अपेक्षा - अखिलेश

ओम बिर्ला यांचे सपाचे नेते अखिलेश यादव यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. खासदारांच्या निलंबनासारखे प्रकार पुन्हा होणार नाहीत, अशी अपेक्षा यादव यांनी यावेळी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते, असे ते म्हणाले. बिर्ला विरोधी सदस्यांबद्दल नि:पक्षपाती भूमिका घेतील आणि त्यांना समान संधी देतील, अशी अपेक्षाही यादव यानी व्यक्त केली.

बिर्ला यांच्याकडून आणीबाणीचा निषेध

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी देशावर आणीबाणी लादण्यात आल्याच्या निषेधाचा ठराव सभागृहात मांडला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. आणीबाणीच्या काळात ज्यांनी यातना भोगल्या त्यांच्या सन्मानार्थ सभागृहात काही क्षण शांतता पाळण्यात आली, काँग्रेस आणि अन्य काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या या कृतीचा निषेध केला.

logo
marathi.freepressjournal.in