ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष, आवाजी मतदानानं झाली निवड

लोकसभेतील एनडीएच्या संख्याबळाच्या आधारे ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित मानलं जात होतं.
ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष, आवाजी मतदानानं झाली निवड
Published on

भाजप खासदार आणि एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड झाली. ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह एनडीएतील सर्व घटकपक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तर विरोधी पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

ओम बिर्ला यांना पाठिंबा पण...

नव्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी, यासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरले. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीएने अध्यक्षपदासाठी गेल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच पसंती दिली, मात्र विरोधकांनी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरविल्याने निवडणूक अटळ होती. ओम बिर्ला यांना पाठिंबा देण्याची तयारी इंडिया आघाडीने दर्शविली, मात्र उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना द्यावे, अशी त्यासाठी पूर्वअट घातली. भाजपने ही अट मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी अखेरच्या क्षणी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला.

ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष-

लोकसभेतील एनडीएच्या संख्याबळाच्या आधारे ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित मानलं जात होतं. दरम्यान सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांना लोकसभेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही त्यांच्यासोबत सीटवर पोहोचले.

पुन्हा एकदा लोकसभेचा अध्यक्ष होणे हे माझे भाग्य: ओम बिर्ला

दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष झाल्यावर ओम बिर्ला यांनी सभागृहाचे आभार मानले. ते म्हणाले की," पुन्हा एकदा लोकसभेचा अध्यक्ष होणे हे माझे भाग्य आहे."

ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “तुम्ही दुसऱ्यांदा या जागेवर विराजमान आहात हे सभागृहाचे सौभाग्य आहे. तुम्हाला माझ्याकडून आणि या संपूर्ण सभागृहाच्या अनेक शुभेच्छा. दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होणे, ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. अमृतकालच्या या महत्त्वाच्या काळात. येत्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे."

logo
marathi.freepressjournal.in