‘नीट’ उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशात MBBS करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून ‘एमबीबीएस’ करण्यासाठी ‘नीट-यूजी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही, असे एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
‘नीट’ उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशात MBBS करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Published on

नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून ‘एमबीबीएस’ करण्यासाठी ‘नीट-यूजी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही, असे एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’चा (एमसीआय) याबाबतचा नियम कायम ठेवला. परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ‘नीट-यूजी’ पात्रतेची वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याने भारतात वैद्यकीय सराव करण्यासाठी आवश्यक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

नियमांची पूर्तता अनिवार्य

हा नियम न्याय्य, पारदर्शक असल्याचे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. ‘नीट-यूजी’साठी पात्र होण्याची आवश्यकता ‘पदवी वैद्यकीय शिक्षण नियम, १९९७’मध्ये विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करण्याव्यतिरिक्त आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्या. बी. आर. गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

आम्हाला नियमांमध्ये ढवळाढवळ करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. सुधारित नियमांच्या अंमलबजावणीनंतर जर एखाद्या उमेदवाराला प्राथमिक वैद्यकीय पात्रता प्राप्त करण्यासाठी परदेशी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तर तो देशांतर्गत वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या नियमांतून सूट मागू शकत नाहीत. यामुळे भारताबाहेर कुठेही सराव करण्याच्या त्यांच्या अधिकारावर मर्यादा येत नाही, अशे खंडपीठाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in