अयोध्या : येथील श्रीराम मंदिर ट्रस्टला चांगल्या पुजाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे श्रीराम मंदिर ट्रस्टने पुजाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक पुजारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून राम मंदिरात सेवा करण्याची संधी मिळवू शकणार आहेत.
अयोध्येत श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. अतिशय मोठे आणि भव्य अशा या मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यावर आले आहे. अवघ्या तीन महिन्यांनी २२ जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते नव्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या दरम्यान मंदिराचा वाढता विस्तार आणि भाविकांची वाढती गर्दी याचा विचार करून पूजापाठ आणि इतर गोष्टींसाठी मंदिर ट्रस्टकडून पुजाऱ्यांची भरती केली जात आहे. मंदिर ट्रस्टकडून याबाबत अधिकृत नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होण्याआधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीत कुशल पुजाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. अयोध्येतील राम मंदिर हे देशभरातील हिंदू भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असणार आहे. त्यामुळे तिथे तशाच पात्रतेचे हुशार पुजारी असणे अपेक्षित आहेत.
पुजारी पदासाठी निकष
पुजारी पदाच्या नोकरीसाठी ३१ ऑक्टोबर २०२३ ही शेवटची तारीख असल्याची माहिती मिळत आहे. ही नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर त्यांना महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल. उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची पुजारी म्हणून मंदिरात नियुक्ती केली जाईल. उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान २००० रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल. रामलल्लाची पूजा ही रामानंदीय परंपरेने होते. या पद्धतीने पूजा करण्याचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांनी गुरुकुल येथून शिक्षा प्राप्त केलेली असावी तसेच रामानंदीय परंपरेनुसार दीक्षा घेतलेली असायला हवी. प्रशिक्षणानंतर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येणार आहे.