रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है, तो सेफ है’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी सडकून टीका केली. ‘बटेंगे तो कटेंगे,’ असे कुणीही संत सांगणार नाही. मात्र एखादा दहशतवादी अशी घोषणा करू शकतो, तुम्ही-आम्ही करू शकत नाही. नाथपंथाचा कोणताही संत असे म्हणू शकत नाही, असा पलटवार खर्गे यांनी केला. “पंतप्रधान मोदी आणि योगी यांनी आधी ठरवावे की, देशात नेमकी कोणती घोषणा लागू करावी. जेणेकरून देशातील जनतेमध्ये कोणताही भ्रम राहू नये,” झारखंडमधील पलामूमध्ये छत्तरपूर विधानसभा क्षेत्रात एका सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच्या घोषणांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
मोदी आणि योगी यांचा उद्देश देशातील एकता संपवण्याचा असून केवळ आपली सत्ता ठेवण्यासाठी ते अशाप्रकारच्या घोषणा देत आहेत. या घोषणांचा उद्देश देशातील लोकांमध्ये फूट पाडणे आहे. जेणेकरून ते आपला राजकीय स्वार्थ साधू शकतील. मोदी आणि योगी करत असलेली घोषणाबाजी ही दादागिरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकांना घाबरवतात. त्यांनी देशातील गरीब, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक लोकांना स्वत:चा उदरनिर्वाह करायला वाऱ्यावर सोडले आहे’, अशी टीका त्यांनी केली.
विरोधकांचा आवाज दडपणे, निवडून आलेली सरकारे उलथून टाकणे आणि बकऱ्यांप्रमाणे आमदारांची खरेदी करून त्यानंतर त्यांनाच कापून मेजवानी झोडणे यावर मोदी यांचा ठाम विश्वास असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.
नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अदानी आणि अंबानी यांच्या मदतीने केंद्र सरकारचा कारभार हाकत आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘मुंह मे राम, बगल मे छुरी’वरच विश्वास असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला.
मोदी आणि शहा यांनी ईडी, सीबीआय आणि अन्य केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षनेत्यांविरोधात वापर केला, मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढतो आणि प्राणांची आहुती देतो, ‘हम डरेंगे, तो मरेंगे’, पण आम्ही घाबरत नाही, असा इशाराही खर्गे यांनी यावेळी दिला.
काँग्रेस घाबरली - भाजप
जातपातीचा नारा देणारी काँग्रेस ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेला घाबरली आहे. योगी आदित्यनाथ यांना दहशतवादी म्हणण्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य काँग्रेसला चांगलेच जड जाणार आहे. दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारी काँग्रेस हिंदू संताला दहशतवादी ठरवून धार्मिक तुष्टीकरण करत आहे, असा हल्लाबोल भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी केला.
अशी विधाने महाराष्ट्रात चालणार नाहीत - नवाब मलिक
‘बटेंगे तो कटेंगे'सारखी विधाने चुकीची, घृणास्पद आहेत. यातून कोणताही फायदा होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशचे खूप नुकसान झाले आहे. अगदी राम मंदिराच्या उभारणीनंतर उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर राजकारण केले पाहिजे. लोकांच्या विकासाची चर्चा व्हायला हवी. हिंदू-मुस्लिमांच्या नावावर कोणीही देशाचे विभाजन करू नये. ही विधाने महाराष्ट्रात चालणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महायुतीचे उमेदवार नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
मोदींना खोटे बोलण्याची सवय
मोदी, शहा, अदानी आणि अंबानी हे चार जण देशाचा कारभार करीत आहेत, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आपण घटना आणि लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मोदी मणिपूरला जाण्यास कचरत आहेत, हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरला जावे, असे आव्हान खर्गे यांनी दिले. मोदी यांना खोटे बोलण्याची सवयच आहे. गुजरातमध्ये सुवर्णयुग आले आहे का, असा सवालही खर्गे यांनी केला.