भारतीय पारंपरिक ज्ञानाचे भांडार मुक्त;केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय 

माहिती भांडार खुले करणे म्हणजे भारतीय पारंपरिक ज्ञानासाठी एक नवीन पहाट असणार आहे.
भारतीय पारंपरिक ज्ञानाचे भांडार मुक्त;केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय 

बौद्धिक स्वामित्व कार्यालयाव्यतिरिक्त पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालयाच्या (टीकेडीएल) माहितीचे भांडार केंद्र सरकारने खुले केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. वापरकर्त्यांसाठी टीकेडीएलचे माहिती भांडार मुक्त करणे हा भारत सरकारच्या दृष्टीने महत्वाकांक्षी आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे. हे माहिती भांडार खुले करणे म्हणजे भारतीय पारंपरिक ज्ञानासाठी एक नवीन पहाट असणार आहे.

भारताच्या समृद्ध आणि अमूल्य अशा पारंपरिक ज्ञानाच्या वारशाचे टीकेडीएल सतत संशोधन करत असते. नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरांच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठीत नेतृत्व विकसित करण्याचे काम टीकेडीएलमध्ये केले जात आहे. भारतीय पारंपरिक ज्ञानामध्ये राष्ट्रीय आणि वैश्विक गरजांची पूर्तता करण्याची पुरेपूर क्षमता आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्र तसेच सिद्ध, युनानी, सोवा, रिग्पा आणि योग हे आजही देश-विदेशात लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे. अलिकडे कोविड-१९ महामारीच्या काळात भारतीय पारंपरिक औषधांचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. त्याचा लाभ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचबरोबर रोगाची लक्षणे ओळखणे, रोगापासून मुक्ती मिळवणे यासाठी तसेच विषाणूविरोधात ही औषधे उपयोगी ठरली.

एप्रिल महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने भारतात पहिले पारंपरिक औषधांचे वैश्विक केंद्र (जीसीटीएम) स्थापित केले आहे. कोणत्याही उद्योगाच्या तंत्रज्ञानासाठी टीकेडीएलची मोठीच मदत होणार आहे. प्रामुख्याने हर्बल हेल्थकेअर, फार्मास्युटिकल्स, फायटोफार्मास्युटिकल्स आणि न्यूट्रास्युटिकल्स, पर्सनल केअर आणि इतर एफएमसीजी कंपन्या, संशोधन संस्था, सार्वजनिक आणि खासगी शैक्षणिक संस्था, अध्यापक आणि विद्यार्थी, बौद्धिक स्वामित्व घेणारे आणि त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी आणि सरकार यांच्यासह इतरांना टीकेडीएलच्या माहिती भांडारामध्ये प्रवेश करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधितांना सशुल्क सदस्यत्व घेता येणार आहे. तसेच हे ज्ञान भांडार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वापरकर्त्यांसाठीही टप्प्याटप्प्याने मुक्त करण्यात येणार आहे.

नाविन्यपूर्ण क्षेत्रात व्यापार वाढीस मदत

भारतीय पारंपरिक ज्ञान असलेल्या ग्रंथालयामधील माहितीचा खजिना आता बौद्धिक स्वामित्व कार्यालयांव्यतिरिक्त इतरांनाही खुला होणार आहे. याचा नाविन्यपूर्ण क्षेत्रात व्यापार वाढविण्यासाठी फायदा होणार आहे. सध्याच्या पद्धतींसोबत पारंपरिक ज्ञान एकत्रित करण्यावर भर देण्यात आला आहे. ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विस्ताव करण्यात टीकेडीएल माहितीचा एक महत्वपूर्ण स्त्रोत ठरेल. त्याचबरोबर नवीन उत्पादक आणि नवोन्मेषींना आपल्या मौल्यवान ज्ञानाच्या वारशाचा फायदा घेता येवून नवीन उद्योग करण्यास प्रोत्साहन मिळू शकणार आहे.

टीकेडीएलविषयी

पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालयाची स्थापना २००१ मध्ये झाली. यामध्ये भारतीय पारंपरिक ज्ञानाचा तसेच पूर्व कलांविषयीच्या माहितीचे भांडार - डेटाबेस तयार करण्यात आले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि भारतीय औषध आणि होमिओपॅथी विभाग यांनी ते स्थापन केले. टीकेडीएल ही अशा वेगळ्या स्वरूपात कार्यरत असणारी जागतिक स्तरावरील पहिलीच संस्था आहे. टीकेडीएलकडील माहितीचे इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डिजिटल स्वरूपात दस्तावेजीकरण केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in