
श्रीनगर : सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन महादेव’अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा करण्यात यश मिळवल्याचे वृत्त आहे. श्रीनगरजवळील जंगलात झालेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांनाही भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोंनी कंठस्नान घातले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील मुख्य सूत्रधार सुलेमान उर्फ असिफ याचा समावेश असल्याची पुष्टी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने दिले आहे.
या कारवाईत ठार झालेल्या अन्य दोघा दहशतवाद्यांची नावे जिबरन आणि हमझा अफगाणी अशी आहेत. जिबरन याचा सोनमर्ग बोगद्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात सहभाग होता.
दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम४ कार्बाईन, एके-४७, १७ रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. काही इतर संशयास्पद वस्तूदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी लष्कराकडून ‘ऑपरेशन महादेव’ची माहिती दिली जाऊ शकते.
दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ची शाखा असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आता जवळपास तीन महिन्यांनंतर भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराचा खात्मा करीत बदला घेतला.
चकमक झालेल्या परिसरामध्ये दहशतवाद्यांचा आणखी एक गट सक्रिय असल्याचे संकेत गुप्तचरांनी दिल्यानंतर लष्कर आणि अन्य सुरक्षा दलांची अतिरिक्त कुमक तेथे पाठविण्यात आली आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटण्यास आणि अन्य कायदेशीर औपचारिकता पार पाडता येणे शक्य होणार आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला
सूत्रांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दाचीगामच्या जंगलात लष्कराला संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. स्थानिक खबऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आणि दहशतवाद्यांबद्दल माहिती दिली.
भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी मोहिमेला जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मोठे यश मिळाले. भारतीय लष्कराचे जवान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’अंतर्गत कारवाई करताना सोमवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यात पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराचाही समावेश आहे. दोन दिवस हे ऑपरेशन चालले. दुर्गम आणि डोंगराळ भागात केलेल्या कारवाईत कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लिडवास परिसरात दहशतवाद्यांनी तात्पुरत्या स्वरुपात बंकर तयार केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवस आधीच दाचीगामच्या जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाली होती. पहलगाम हल्ल्याशी संबंधित मॉड्युलचे हे दहशतवादी असू शकतात, अशी माहिती हाती लागली होती. त्यानंतर हे ‘ऑपरेशन महादेव’ राबवण्यात आले.
सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेराव घातला. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. तब्बल एक तास ही चकमक सुरू होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. साधारण तासाभरानंतर ड्रोन फुटेजच्या माध्यमातून तीन दहशतवाद्यांना टिपल्याची खात्री पटली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हल्ल्याचा सूत्रधारही होता.
कोणते दहशतवादी सहभागी?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी आसिफ फौजी (कोडनेम मुसा), सुलेमान शाह (युनुस) आणि अबू तल्हा (आसिफ) यांचा सहभाग होता. इतर दोन दहशतवादी आदिल गुरी आणि अहसान हे स्थानिक दहशतवादी होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन महादेव’ अद्याप थांबलेले नाही. याच परिसरात लपून बसलेल्या उर्वरित दोन ते चार दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. लिडवास आणि आजूबाजूच्या जंगल परिसरात ही शोध मोहीम सुरूच आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर, ७ मे २०२५ रोजी, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले. पण दहशतवाद्यांची मुळे उखडून टाकण्यासाठी सैन्याने एक दीर्घ रणनीती आखली, ज्याला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले. हे ऑपरेशन गेल्या ९६ दिवसांपासून सुरू होते आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडणे किंवा मारणे हे त्याचे उद्दिष्ट होते. भारतीय लष्कराला श्रीनगरमधील महादेव पर्वताजवळील लिडवासच्या सामान्य भागात तीन परदेशी दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी 'ऑपरेशन महादेव' ही संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
सलग दोन दिवस मोहीम
दहशतवाद्यांची संभाव्य ठिकाणांची खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी स्थानिक बकरवाल समूह आणि गस्तीवर असलेल्या युनिट्सकडून मदत घेण्यात आली. त्यानंतर परिसरात २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅराच्या स्पेशल युनिट्सला तैनात करण्यात आले. सलग दोन दिवस शोधमोहीम सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दहशतवाद्यांशी चकमक झाली.