नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत पाकिस्तानातील १०० दहशतवादी ठार झाले. या मृत दहशतवाद्यांमध्ये पुलवामा, कंदाहार विमान अपहरणातील सूत्रधारांचा समावेश होता. या मोहिमेत पाकच्या ४० सैनिकांना यमसदनी धाडले आहे. तर भारताचे ५ जवान शहीद झाले, अशी माहिती भारतीय सैन्य दलाने रविवारी दिली. पाकिस्तानने युद्धविराम तोडल्यास त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा सैन्य अधिकाऱ्यांनी दिला.
भारत-पाकिस्तान तणाव व ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत रविवारी सायंकाळी भारतीय सैन्य दलाने पत्रकार परिषद घेतली. लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल राजीव घई (डीजीएमओ), नौदलातर्फे व्हाईस ॲॅडमिरल एएन प्रमोद (डीजी, नौदल ऑपेरशन) आणि हवाई दलाकडून एअर मार्शल ए. के. भारती (डीजी, एअर ऑपरेशन) आदी सहभागी झाले होते. या तिन्ही अधिकाऱ्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे तपशीलवार सादरीकरण केले. तसेच भारतीय सैन्यदलाच्या कारवाईचे पुरावे दाखवले.
‘डीजीएमओ’ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाचा कट आखणाऱ्यांविरुद्ध व दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी राबवण्यात आले. आम्ही सीमेपलिकडील दहशतवादी तळ व इमारतींची ओळख पटवली. त्यातील काही तळ यापूर्वीच रिकामी केले होते. कारण त्यांना आमच्या कारवाईची भीती होती.
दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त
डीजीएमओे म्हणाले की, पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांची ओळख आमच्या वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणांनी केली. त्यातील काही पाकव्याप्त काश्मीर व काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होते.
‘लष्कर-ए-तोयबा’चा गढ असलेला मुरीदके येथील तळावर अजमल कसाब आणि डेविड हेडली आदी कुख्यातांनी प्रशिक्षण घेतले आहे. मृत दहशतवाद्यांमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सर अहमद सारखे लक्ष्य होते. हे दहशतवादी आयसी ८१४ विमान अपहरण आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी होते.
पाकने भारतीय हद्दीत ड्रोन, विमाने पाठवली
घई पुढे म्हणाले की, ८ व ९ मे रोजी रात्री पाकिस्तानने भारताच्या सीमेत ड्रोन व विमाने पाठवली. भारताच्या सैनिकी आस्थापनांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्यानंतर भारताने तोफखान्याद्वारे त्यांना सडेतोड उत्तर दिले.
पाकच्या लष्करी आस्थापनांवर हल्ला नाही
मुरीदके दहशतवादी तळानंतर बहावलपूर दहशतवादी तळाची निवड आम्ही केली. हे दोन्ही दहशतवादी तळ आम्ही उद्ध्वस्त केले. पाक लष्करी आस्थापना व पायाभूत सुविधांना आम्ही लक्ष्य केले नाही, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारताचे सर्व वैमानिक सुरक्षित
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा सैन्य अधिकाऱ्यांनी दिला.
लाहोरमधील रडार उद्ध्वस्त
हवाई दलाचे महासंचालक (एअर ऑपरेशन्स) एअर मार्शल अवधेश कुमार भारती म्हणाले की, ८ मे रोजी भारतीय हवाई दलाने लाहोर येथील पाकिस्तानी रडार साईट्स उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. आम्ही हे सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानी ड्रोन आणि मानवविरहीत प्रणालीने भारतीय एअरबेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा आधीच तयार होत्या. त्यामुळे आम्ही पाकचे हल्ले परतवून लावले, असे ते म्हणाले.
कराचीवर हल्ल्यास नौदल तयार होते!
व्हाईस ॲॅडमिरल ए. एन. प्रमोद म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाने युद्धनौका, पाणबुड्या व विमाने समुद्रात युद्धाच्या तयारीने तैनात केल्या होत्या. आम्ही समुद्रात शस्त्रास्त्रांचा सराव केला. कराचीसहित जमिनीवर काही लक्ष्यांवर हल्ला करण्यास आम्ही तयार होतो. पाकिस्तानच्या बंदर व बंदराजवळच्या प्रदेशात आमची बारीक नजर होती, असे त्यांनी सांगितले.