भारताचीही विमाने पडली, पण पाकला हादरवले! ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेबाबत सीडीएस अनिल चौहान यांची पहिल्यांदाच अप्रत्यक्ष कबुली

कोणतेही युद्ध हे नुकसानीशिवाय लढले जाऊ शकत नाही. पाकिस्तानसोबत नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची लढाऊ विमाने पाडली गेली, पण दहशतवादी हल्ला करून पळून जाणाऱ्या पाकिस्तनाच्या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या, याची कबुली भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिली.
भारताचीही विमाने पडली, पण पाकला हादरवले! ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेबाबत सीडीएस अनिल चौहान यांची पहिल्यांदाच अप्रत्यक्ष कबुली
Published on

सिंगापूर : कोणतेही युद्ध हे नुकसानीशिवाय लढले जाऊ शकत नाही. पाकिस्तानसोबत नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची लढाऊ विमाने पाडली गेली, पण दहशतवादी हल्ला करून पळून जाणाऱ्या पाकिस्तनाच्या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या, याची कबुली भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिली. भारताची किती विमाने पडली, यापेक्षा ती पडल्यानंतर तिन्ही सशस्त्र दलांनी त्याचा बोध घेऊन आम्ही दोन दिवसांत योग्य रणनीती आखली आणि पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला, अशा शब्दांत त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेची रणनीती उलगडून सांगितली.

सिंगापूर येथील शांगरी-ला डॉयलॉग या कार्यक्रमात चौहान सहभागी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘ऑपरेशन सिंगूर’बाबत विविध खुलासे केले. भारत आणि पाकिस्तान संघर्षात भारताची किती विमाने पाडली गेली, या प्रश्नावर उत्तर देताना चौहान म्हणाले की, “पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारताची लढाऊ विमाने पाडली गेली, मात्र त्याची संख्या आपण सांगू शकत नाही. तसेच भारताची सहा विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला.”

ते पुढे म्हणाले की, “भारताची किती विमाने पडली, यापेक्षा का पडली, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. भारताने आपल्या रणनीतिक चुका ओळखल्या आणि त्यातून तत्काळ बोध घेत दोन दिवसांत सुधारणा केली आणि नवीन रणनीती लागू केली. त्यानंतर आम्ही पाकिस्तानला अचूक व प्रभावी उत्तर दिले. या काळात आम्ही दूरवरील लक्ष्यभेद केला.”

“भारत-पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण, भारताने पाकिस्तानला सर्वच क्षेत्रात मागे टाकले आहे. भारतात विविधता, आर्थिक सक्षमता, मानवी विकास व सामाजिक सद‌्भाव आहे. हे आमच्या दीर्घकालीन धोरणांचे परिणाम आहेत. २०१४ मध्ये आम्ही राजनैतिक पातळीवर पाकशी संपर्क साधला होता. तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी पाकचे नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले. पण, टाळी दोन्ही हाताने वाजते. आम्हाला पाकिस्तानकडून मैत्रीच्या बदल्यात केवळ शत्रुत्व मिळाले. आता वेगळे राहणे हे चांगले धोरण असू शकते,” असेही त्यांनी सांगितले.

एअर मार्शलनी दिली होती नुकसानीची कबुली

भारतीय हवाई दलाचे डायरेक्टर जनरल ऑफ एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए. के. भारती यांनी ११ मेच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “लढाईत नुकसान होणे सामान्य बाब आहे. आमचे सर्व वैमानिक सुरक्षित परतले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हवाई

दलाने पूर्ण क्षमतेने प्रहार केला आणि शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले.” भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत दहशतवाद्यांच्या तळावर अचूक हल्ले केले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली होती.

देशाची दिशाभूल; तत्काळ संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - काँग्रेस

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानातील संघर्षात केंद्र सरकारने देशाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे तत्काळ संसदेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सीडीएस अनिल चौहान यांनी विमानांचे नुकसान झाल्याची कबुली दिल्यानंतर राजकारण तापले आहे.

खर्गे यांनी ‘एक्स’वरून सांगितले की, “भारताच्या संरक्षण तयारीचा पुनर्आढावा घेणे महत्त्वाचे आहे. कारगील युद्धानंतर भारताने याबाबत समिती बनवली होती. सीडीएस चौहान यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर काही महत्त्वाचे प्रश्न विचारणे गरजेचे बनले आहे. हे केवळ संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यानंतरच शक्य होऊ शकेल.

मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली. आता सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. शत्रूशी लढताना वैमानिक आपला जीव धोक्यात टाकतात. काही नुकसान होऊ शकते. पण आमचे वैमानिक सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in