
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चा पुढील आठवड्यात २८ जुलै रोजी (सोमवारी) लोकसभेत तर २९ जुलै रोजी (मंगळवारी) राज्यसभेत होणार आहे. या विशेष चर्चेसाठी सरकारने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींसाठी प्रत्येकी १६ तासांची वेळ दिली आहे. तसेच विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या चर्चेत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील आठवड्यात सोमवारी लोकसभेत या चर्चेला सुरूवात होईल, त्यानंतर राज्यसभेत मंगळवारी चर्चा होईल. सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये या चर्चेसाठी भरपूर वेळ दिला आहे, मात्र विरोधकांकडून या मुद्द्यावर उद्यापासूनच चर्चा घेतली जावी अशी मागणी केली जात होती. पण मोदी यांच्या परदेश दौऱ्याचे कारण देत सरकारने ही मागणी फेटाळली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार दावा करत आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम घडवून आणला. सरकारने याचे खंडन केले आहे. मात्र, ट्रम्प यांच्या विधानाचा वापर विरोधकांकडून सत्ताधारी पक्ष आणि मोदी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधक करत आहेत.
बिहार मतदार याद्यांवरून लोकसभेत गोंधळ
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि बिहार मतदार याद्यांवरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि बिहार मतदार याद्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी करीत घोषणाबाजी केली आणि फलकही फडकावले. तेव्हा सदस्यांचे वर्तन हे रस्त्यावरचे असल्याची समज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आणि आपल्याला कडक कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला.
राज्यसभेतही गदारोळ
राज्यसभेतही ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि बिहार मतदारयाद्यांच्या मुद्द्यावरून सदस्यांनी गोंधळ घातला. पीठासीन अधिकारी घन:श्याम तिवारी यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, तेव्हा विरोधी सदस्यांनी बिहार मतदारयाद्यांवर चर्चा करण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.