‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान उपग्रहांनी अहोरात्र केले काम; ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पाकिस्तानविरुद्ध भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे योगदान अधोरेखित केले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आपले सर्व उपग्रह उत्तमप्रकारे काम करत होते.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान उपग्रहांनी अहोरात्र केले काम; ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती
Published on

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पाकिस्तानविरुद्ध भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे योगदान अधोरेखित केले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आपले सर्व उपग्रह उत्तमप्रकारे काम करत होते. सर्व उपग्रहांनी दिवसरात्र काम करत सर्व गरजांची पूर्तता केली. ‘इस्रो’ने स्थापित केलेल्या सर्व उपग्रहांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, असेही त्यांनी नमूद केले.

“ऑपरेशन सिंदूर’दरम्यान ४०० हून अधिक शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस काम केले. लष्करी कारवाईदरम्यान निरीक्षणे आणि उपग्रहांद्वारे मदत पुरवली जात होती,” असेही त्यांनी सांगितले. ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या (एआयएमए) ५२ व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेला संबोधित करताना नारायणन म्हणाले की, “राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांसाठी इस्रोने उपग्रह डेटा पुरवला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सर्व उपग्रह चोवीस तास कार्यरत होते आणि सर्व आवश्यकता पूर्ण करत होते. ४०० हून अधिक शास्त्रज्ञ पूर्ण क्षमतेने दिवसरात्र काम करत होते आणि मोहिमेदरम्यान सर्व पृथ्वी निरीक्षण आणि संप्रेषण उपग्रह पूर्णपणे कार्यरत होते.”

‘इस्रो’ प्रमुख नारायणन म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात स्वदेशी ‘आकाश’सारख्या ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालींच्या क्षमतांची मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली. मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ७,७०० हून अधिक जमिनीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि येणाऱ्या मानवी अंतराळ उड्डाणापूर्वी आणखी २,३०० चाचण्या केल्या जातील. ‘गगनयान’ मोहिमेंतर्गत, इस्रो तीन मानवरहित मोहिमा राबवेल, ज्यापैकी पहिली मोहीम यावर्षी डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा राबवल्या जातील.”

चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याचे ध्येय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार, पुढील तीन वर्षांत पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांची संख्या सध्याच्या संख्येच्या किमान तिप्पट म्हणजेच ५८ केली जाणार आहे. ‘गगनयान’ प्रकल्पांतर्गत दोन मानवयुक्त मोहिमा राबविण्यासही मंजुरी मिळाली आहे. नारायणन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३५ पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे आणि २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याचे ध्येय ‘इस्रो’वर सोपवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in