
नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर बुधवारी मध्यरात्री पाकिस्ताननेही बदला म्हणून भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाकडून मिळालेल्या ‘एस-४००’ या संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारताने हा हल्ला हाणून पाडला. त्यानंतर गुरुवारी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या ९ ठिकाणी ड्रोन हल्ले करत लाहोरमधील अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्यांमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर व राजस्थानमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, भारताने हे हल्ले परतवून लावत पाकची तीन विमाने पाडली. या परस्पर हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष चिघळल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी रात्री आत्मघातकी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यामुळे राजस्थान व जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात ‘ब्लॅकआऊट’ करण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानचे सर्व हल्ले भारताच्या ‘एस-४००’ हवाई संरक्षण यंत्रणेने परतावून लावले. राजस्थान, पंजाबमधील सीमेवरही पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. जम्मू-पठाणकोट येथे आत्मघातकी ड्रोनने हल्ले केले. या ड्रोननी जम्मू विमानतळ व पठाणकोट हवाई तळावर हल्ल्याचा प्रयत्न केला. तो संरक्षण यंत्रणेने निष्फळ ठरवले.
आरएस पुरा विभागात आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून कुपवाडा व बारामुल्ला येथे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. त्याला भारतीय लष्कर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. तसेच पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने भारताने पाडली आहेत. त्यात एक ‘एफ-१६’ व दोन ‘जे-१७’ या विमानांचा त्यात समावेश आहे.
पाकिस्तानचा हल्ला हमासप्रमाणे
पाकिस्तानी लष्कराची कृती ही ‘हमास’ या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे आहे. ते हल्ल्यासाठी साधी रॉकेटस् वापरत आहेत, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानेही गुरुवारी सकाळी ‘ईंट का जवाब पत्थर से’ म्हणत चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागत हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणा लक्ष्य केल्या. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानेही त्याच क्षेत्रात आणि त्याच तीव्रतेने चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या हल्ल्यात लाहोरमधील पाकची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाली. चीनकडून पाकिस्तानला मिळालेली ‘एचक्यू-९’ ही रडार यंत्रणा भारताच्या लढाऊ विमानांचा माग काढून त्यांची रडार यंत्रणा बंद पाडू शकत होता. तसेच या यंत्रणेचा वापर करून हवेतील विमानांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करता येते. मात्र, आता भारताने पाकिस्तानची ही रडार यंत्रणाच उद्ध्वस्त केली आहे.
एचक्यू-९ ही ‘चीन प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्स्पोर्ट कॉर्पोरेशन’ने विकसित केलेली आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण मानली जाते. त्यामुळेच पाकिस्तानने २०२१मध्ये चीनकडून ही यंत्रणा आपल्या ताफ्यात सामील करून घेतली होती. १२५ ते २०० किलोमीटरचा रेंज असलेली तसेच एकाच वेळी १०० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. पण आता ही प्रणाली उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेले आहे.
कंदाहार विमान अपहरणाचा सूत्रधार रौफही हल्ल्यात ठार?
भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईत कंदाहार विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार रौफ असगर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा समावेश असून आता रौफ असगरही हल्ल्यात ठार झाल्याची बातमी आहे. रौफ हा मौलाना मसूद अझहरचा लहान भाऊ आहे.
७ राज्यांतील २७ विमानतळे ९ मेपर्यंत बंद
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ९ मेपर्यंत ७ राज्यांमधील २७ विमानतळे बंद केली आहेत. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील २७ विमानतळे बंद आहेत. तसेच एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी गुरुवारी सुमारे ४३० उड्डाणे रद्द केली.
कोणती विमानतळे?
जम्मू आणि काश्मीर : श्रीनगर, जम्मू, लेह. पंजाब : अमृतसर, लुधियाना, पटियाला, बठिंडा, हलवारा, पठाणकोट, चंदीगड. हिमाचल प्रदेश : भुंतर, शिमला, गग्गल, धर्मशाळा. राजस्थान : किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर. गुजरात : मुंद्रा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कांडला, केशोद, भुज. मध्य प्रदेश : ग्वाल्हेर. उत्तर प्रदेश : हिंडन
पाकिस्तानी चित्रपट आणि गाण्यांवर बंदी
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना पाकिस्तानी वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर सामग्री तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश सबस्क्रिप्शन आणि मोफत कंटेंट दोन्हीवर लागू होतील. ज्याची निर्मिती पाकिस्तानात झाली आहे, ते सर्व हटविण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. याचा अर्थ नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, यूट्यूब, जिओ सिनेमा आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पाकिस्तानच्या चित्रपट, वेबसीरिज, संगीत आणि गाण्यांना आता हटवले जाणार आहे.
पाकिस्तान सोडण्यास तयार राहा अमेरिकेचे नागरिकांना आवाहन
अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नये, अशा सूचना अमेरिकन सरकारकडून देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा, असेही अमेरिकेने सांगितले आहे.
सुट्टया रद्द
पंजाब, राजस्थान, प. बंगाल, दिल्ली सरकारने आपल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुटट्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना उध्वस्त करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला होता. मात्र, भारताच्या कारवाईनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न भारताच्या रडार प्रणालीने हाणून पाडला. पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील शहरांना लक्ष्य केले. या काळात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथे पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, पाकिस्तानचे हे सर्व हल्ले भारताने ‘इंटिग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रिड’ आणि हवाई संरक्षण प्रणालीने निष्प्रभ केले. अनेक ठिकाणी पाडण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्राचे सांगाडे सापडले आहेत. त्यातून पाकिस्तानने हल्ले केल्याचे सिद्ध झाले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांचा झारखंड दौरा रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झारखंडच्या रांची येथे १० मे रोजी पूर्वविभागीय आंतरराज्यीय परिषदेची २७वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते ९ मे रोजी अमित शहा रांचीमध्ये दाखल होणार होते. मात्र ही बैठक स्थगित करण्यात आल्याने अमित शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. या बैठकीसाठी झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार होते. पण चारही राज्यांना बैठक स्थगितीची सूचना दिली गेली आहे.
एस-४०० प्रणाली नक्की काय?
एस-४०० ही हवाई संरक्षण प्रणाली हवेतून होणारे हल्ले रोखते. शत्रू देशांची क्षेपणास्त्रे, ड्रोन, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे. ते ६०० किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा मागोवा घेऊ शकते आणि त्यांचा लक्ष्य करण्याचा पल्ला ४०० किमी आहे. एस-४०० प्रणाली रशियाच्या ‘अल्माझ सेंट्रल डिझाईन ब्युरो’ने विकसित केली असून जगातील सर्वात आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींमध्ये त्याची गणना केली जाते.
‘ऑपरेशन सिंदूर’चे शीर्षक मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. आता याच नावावरून चित्रपट काढण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. जवळजवळ ५० चित्रपट निर्मात्यांनी ऑपरेशन सिंदूर शीर्षकाच्या नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. हे टायटल मिळविण्यासाठी एकूण ४०-५० लोक शर्यतीत आहेत, असे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी स्पष्ट केले. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनेही ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रिजच्या जिओ स्टुडिओने हा अर्ज मागे घेतला आहे.