
इस्लामाबाद : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याच दरम्यान, पाकिस्तानने एक उपग्रहाचे छायाचित्र शेअर करुन पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला. हा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानने खोटेपणा पसरवण्यास आणि भारतीय हवाई तळ आणि प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याच्या बनावट गोष्टी रचण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडे दाखवण्यासाठी कोणतेही पुरावे नसल्याने, ते आता छेडछाड केलेल्या सॅटेलाईट फोटो आणि चुकीच्या माहितीचा वापर करत आहे. गेल्या महिन्यात, फोटो विश्लेषक डेमियन सायमन यांनी पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश केला. 'पाकिस्तानने चीनच्या उपग्रह कंपनीने दिलेल्या फोटोंमध्ये कसे फेरफार करून खोटे फोटो तयार केल्या आहेत', हे स्पष्ट केले.
पाकिस्तानने भारताच्या आदमपूर हवाई तळावर सुखोई-३०एमकेआयवर हल्ला करून त्याचे नुकसान केल्याचा दावा केला होता. या दाव्याच्या समर्थनार्थ वापरल्या गेलेल्या उपग्रह फोटोंमध्ये जळालेल्या जागेजवळ एक जेट विमान दिसत होते. तपासणीनंतर आढळून आले की, हा फोटो संघर्षापूर्वीचा आहे आणि प्रत्यक्षात नियमित देखभालीखाली असलेले मिग-२९ विमान दाखवले आहे. इंजिनच्या वारंवार चाचणीमुळे काजळी साचल्याने झालेले नुकसान हे कथित नुकसान होते.