नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवित पाकिस्तानला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर, देशाचे ऐक्य आणि संरक्षण क्षेत्रातील भारताची वाढती न आत्मनिर्भरता याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येवर देशाला उद्देशून गुरुवारी केलेल्या भाषणात स्तुती केली.
निष्पाप पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड आणि अमानवी हल्ला करण्यात आला त्याचा मुर्मू यांनी निषेध केला. भारताच्या शूर जवानांनी सीमेपलीकडे घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले आणि सामरिक स्पष्टता आणि तांत्रिक क्षमतेचे प्रदर्शन केले, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
आपल्या देशाच्या रक्षणाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपली सशस्त्र दले सज्ज असतात हे 'ऑपरेशन सिंदूर'ने दर्शवून दिले. 'ऑपरेशन सिंदूर' हे निर्णायक पद्धतीने आणि समर्थपणे दिलेले प्रत्युत्तर होते. पहलगाममधील हल्ला भ्याड आणि अमानवी होता. 'ऑपरेशन सिंदूर' हे मानवतेचा दहशतवादाविरुद्धचा लढा म्हणून इतिहासात उदाहरण म्हणून नोंदले जाईल.
भारत आत्मनिर्भरतेच्या वाटेवर असून मोठ्या आत्मविश्वासाने मार्गक्रमण करीत आहे. महागाई नियंत्रणात असून निर्यातीमध्ये वाढ होत आहे, भारतीय अर्थव्यवस्था सशक्त असल्याचे सर्व परिमाण दर्शवत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी दर ६.५ टक्के होता, भारत जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असेही त्या म्हणाल्या. काश्मीर खोऱ्यातील रेल्वे सेवेमुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल. उत्तम प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त स्थिती यासह भविष्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेची चाचणी होती आणि त्यामधून जे निष्पन्न झाले त्यावरून आपला मार्ग योग्य असल्याचे स्पष्ट झाले, असेही द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.