‘सिंदूर’वरून लोकसभेत खडाजंगी; ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नाही - जयशंकर

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी कृत्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवून पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. या मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केंद्राने वारंवार पुढे ढकलली होती. आता लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सोमवारी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र ANI
Published on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी कृत्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवून पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. या मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केंद्राने वारंवार पुढे ढकलली होती. आता लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सोमवारी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा जोरदार प्रयत्न केला.

लोकसभेत सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल ते १७ जूनपर्यंत ट्रम्प व मोदी यांच्यात संभाषण झाले नाही. कोणत्याही स्तरावर अमेरिकेसोबत व्यापाराबाबत चर्चा झाली नाही. या वक्तव्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला, तेव्हा गृहमंत्री अमित शहा मध्ये उठले व म्हणाले की, भारताचे परराष्ट्रमंत्री भाषण करीत आहेत. विरोधकांना त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना अन्य कोणत्या तरी देशावर विश्वास आहे, म्हणूनच तुम्ही विरोधी पक्षात बसले आहात. आणखी २० वर्षे तिथेच बसणार आहात.

जयशंकर पुढे म्हणाले की, दहशतवादाच्याविरोधात आपले संरक्षण करण्याच्या अधिकाराचा वापर आम्ही करत होतो. ७ मे रोजी ज्या ठिकाणावर हल्ला केला ते दहशतवादी मुख्यालय होते. भारत आणि पाकिस्तानदरम्यान कोणीही मध्यस्थी केलेली नाही. दोन्ही देशात कोणत्याही विषयावर द्विपक्षीय चर्चा होते. आम्ही पाकिस्तानी सैन्य हल्ल्याचे उत्तर देतो कारण, ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर त्यांनी आमच्या सैन्य तळांवर हल्ले केले. आम्ही पाक सैन्यावर हल्ले सुरूच ठेवू, असे जयशंकर म्हणाले.

आम्ही जगाला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवला. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने होते. आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपली बाजू मांडली. आमच्या परराष्ट्र धोरणामुळे दहशतवादी संघटना ‘टीआरएफ’ला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले.

पहलगामचे हल्लेखोर अद्याप मोकाट का?

लोकसभेत काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ का थांबवण्यात आले? पहलगाम हल्ल्याला १०० दिवस झाले तरीही दहशतवादी अजूनही मोकाट का आहेत? या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. संरक्षणमंत्री सांगतात, आमचे लक्ष्य युद्ध नव्हते, का नव्हते? ते असायला हवे होते. आता पाकव्याप्त काश्मीर घेणार नाही तर कधी घेणार? संपूर्ण देश व विरोधी पक्ष पंतप्रधानांसोबत उभा होता तर अचानक युद्धविराम का केला? पाकिस्तानला गुडघे टेकायला लावायचे होते तर तुम्ही का झुकलात? असा प्रश्न गोगोई यांनी विचारला.

निकाल महत्त्वाचा असतो - राजनाथ

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितले की, आपली किती विमाने पडली असे प्रश्न विरोधी पक्ष करत आहे. पण, परीक्षेत पेन्सील किती तुटल्या, पेन हरवले का? हे महत्वाचे नाही. तर निकाल महत्वाचा असतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ला थांबवले, कारण लष्कराने आपले राजनैतिक व लष्करी लक्ष्य पूर्ण केले. ही मोहीम रोखण्यासाठी कोणताही दबाव नव्हता. पाकिस्तानने पुन्हा हल्ला केल्यास ही मोहीम पुन्हा सुरू होऊ शकते.

९ दहशतवादी तळांवर हल्ले

भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. त्यातील ७ तळ पूर्णपणे उद‌्ध्वस्त झाले. आमच्याकडे पाक व पाकव्याप्त काश्मीरात झालेल्या नुकसानीचे पुरावे आहेत. या मोहिमेत कोणत्याही भारतीय जवानाचे नुकसान झाले नाही. मोहिमेपूर्वी सैन्य दलांनी प्रत्येक बारीकसारीक बाबीचा अभ्यास केला होता, असे त्यांनी सांगितले.

आपल्यासोबत कोणताच देश नव्हता - अरविंद सावंत

शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सर्व विरोधी पक्ष उभा होता. देशाबाबत बोलत असाल तर आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने बोलत आहेत. त्यावेळी कोणी ट्रम्प यांचे नाव घेऊन बोलले का? पाकिस्तान आमच्यासमोर हतबल झाला तेव्हा आम्ही युद्धविराम केला. ट्रम्प सातत्याने मी युद्धविराम केला, असे बोलत आहेत. चीन व तुर्कीये पाकला मदत करत होते. आपल्यासोबत कोणताच देश नव्हता, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे सावंत म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’ नको, ‘ऑपरेशन तंदूर’ चालवा - सपा

समाजवादी पक्षाचे खासदार रमाशंकर राजभर म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर तिसऱ्या दिवशी देशाला ‘ऑपरेशन सिंदूर’ची नव्हे तर ‘ऑपरेशन तंदूर’ची गरज होती. जम्मू-काश्मीर सरकारने तीन महिन्यानंतर सांगितले, सुरक्षेत चूक झाली. दहशतवादी खुलेआम कसे फिरत आहेत. ट्रम्प यांचा दावा स्पष्ट करतो की, मोदी सरकारने अमेरिकन सरकारच्या हस्तक्षेपाला परवानगी दिली.

अमित शहा आज बोलणार

गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेत मंगळवारी दुपारी १२ वाजता चर्चेत सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची वेळ अजून निश्चित झालेली नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सायंकाळी मोदी हे चर्चेत सहभागी होऊ शकतात.गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेत मंगळवारी दुपारी १२ वाजता चर्चेत सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची वेळ अजून निश्चित झालेली नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सायंकाळी मोदी हे चर्चेत सहभागी होऊ शकतात.

logo
marathi.freepressjournal.in