

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी "ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही", असे स्पष्टपणे सांगितले. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहितीही त्यांनी या बैठकीत दिली. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही या माहितीला दुजोरा दिला.
आम्हाला अजून लष्करी कारवाई करायची नाही, पण...
राजनाथ सिंह यांनी बैठकीत, या ऑपरेशनची अधिक तांत्रिक माहिती उघड करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तथापि, पाकिस्तानने हल्ला केल्यास भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. भारत सरकारला आणखी कोणतीही लष्करी कारवाई करायची नाही, परंतु शत्रू सैन्याने हल्ला केल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी आणि काँग्रेसचे समर्थन
बैठकीत बोलताना खरगे म्हणाले, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पीओकेमधील नऊ ठिकाणी जी कारवाई केली त्याबाबत सरकारने सर्व राजकीय पक्षांना माहिती दिली. काही माहिती गोपनीय असल्यामुळे उघड केली जाऊ शकत नाही, हे आम्ही समजतो. अशा कठीण प्रसंगी आम्ही सरकारवर दबाव आणत नाही आणि राष्ट्रहितासाठी सरकारसोबत आहोत." राहुल गांधी म्हणाले, "आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. खरगेजींनी जे सांगितले तेच आमचेही म्हणणे आहे - काही मुद्द्यांवर सरकार चर्चा करू इच्छित नाही, ते आम्ही मान्य करतो."
सर्व राजकीय पक्ष एकाच सुरात बोलले - किरण रिजिजू
सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. तसेच, सर्वपक्षीय बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. सर्व राजकीय नेत्यांनी भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कारवाईला पाठिंबा दिला, असे सांगितले. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले, “सर्व राजकीय पक्ष एकाच सुरात बोलले, हे सरकारचं यश आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतरच्या घडामोडी सतत सुरू असल्यामुळे अधिकाऱ्यांना बैठकीत बोलावण्यात आले नव्हते. मात्र पुढील कारवाईसंदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे.”
बैठकीत सहभागी नेते
या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवले. यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने गृह मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांतून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, एआयएमआयएमचे असद्दुद्दीन ओवैसी, तृणमूल काँग्रेसचे सुदीप्त बंधोपाध्याय,शिवसेनेचे श्रीकांत शिंदे,आपचे संजय सिंह,माकपचे जॉन ब्रिटास,लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, द्रमुकचे टी.आर. बालू व तिरूचि शिवा, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा हे नेतेही सहभागी झाले होते.