आज बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुढाकाराने पाटणा येथे देशाच्या १५ विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच देशातल्या विरोधी पक्षांनी किमान समसमान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत दिल्लीतील अध्यादेशावर काँग्रेसने राज्यसभेत आपच्या बाजूने समर्थन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे.
मोदी हुकूमशाहप्रमाणे देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्यात काही मतभेद असतील पण सर्वांना एकत्रित करुन तसंच सर्वांचे विचार एकत्र घेऊन जाणार असलयल्याचं ते म्हणाले.
यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटण्याहून सुरु झालेली आंदोलने मोठी झाली हा इतिहास आहे. त्यामुळे ही बैठक दिल्लीत नाही तर पाटण्यात घेण्याचा विचार मी मांडला. आम्ही सर्व एक असून एकत्रित लढणार आहोत. आम्हीही देशभक्त आहोत. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत, असं त्यांनी म्हटलं.
देशात सांप्रदायिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला असून आता आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्र येऊन करायला हवा, असं पवार म्हणाले आहेत. तसंच जयप्रकाश यांच्या नेतृत्वात पाटण्यातून सुरु झालेलं आंदोलन देशात पोहचलं होतं. आता देखील हेच होताना पाहायला मिळेल, असं देखील ते म्हणाले.
मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू - काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे तीच आता देशभरात असून गांधी नेहरुंच्या विचाराच्या या देशाला वाचवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची मत मतांतरे असतील, परंतु देश एक आहे. स्वातंत्र्यावर जो आघात करेल त्याला आम्ही मिळून विरोध करू, देशात तानाशाही आणायचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही विरोध करत राहू. अशा बैठका आता सातत्याने होताना पाहायला मिळतील, असं म्हटलं आहे.
विरोधी पक्षांची पुढची बैठक शिमल्याला होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. १२ किंवा १३ जूलै रोजी ही बैठक होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.