राहुल गांधी यांचा हल्लाबोल; इंदूरमध्ये पाणी नाही, विष दिले गेले, प्रशासन कुंभकर्णासारखे झोपेत राहिले!

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर टीका केली आहे. इंदूरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही तर विष देण्यात आले, प्रशासन कुंभकर्णासारखे झोपले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांचा हल्लाबोल; इंदूरमध्ये पाणी नाही, विष दिले गेले, प्रशासन कुंभकर्णासारखे झोपेत राहिले!
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जणांची प्रकृती गंभीर आहे. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर टीका केली आहे. इंदूरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही तर विष देण्यात आले, प्रशासन कुंभकर्णासारखे झोपले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश आता कुशासनाचे केंद्र बनले आहे. कुठे कफ सिरपमुळे मृत्यू, कुठे सरकारी रुग्णालयांमध्ये उंदीर मुलांना मारत आहेत आणि आता सांडपाणी मिसळलेले पाणी पिण्यामुळे मृत्यू. जेव्हा जेव्हा गरीब मरतात, तेव्हा मोदी नेहमीप्रमाणे गप्प राहतात, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.

मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर टिप्पणी करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, प्रत्येक घरात संकट आहे, गरीब त्रासात आहे, परंतु भाजप नेते अहंकारात बुडालेले आहेत. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले की, इंदूरमध्ये पाणी नाही तर विष वाटण्यात आले आणि प्रशासन कुंभकर्णासारखे झोपेत होते. प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे, गरीब असहाय्य आहेत आणि तरीही वरून भाजप नेते अहंकारी विधाने करत आहेत. ज्यांच्या चुली विझल्या आहेत त्यांना सांत्वनाची गरज होती. मात्र सरकार त्याच अहंकारात राहिले. तसेच, लोकांनी घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त पाण्याबद्दल वारंवार तक्रार केली, तरीही सुनावणी का झाली नाही, असा सवालही राहुल गांधींनी केला आहे.

जगण्याचा अधिकार

याशिवाय, सांडपाणी पिण्याच्या पाण्यात कसे मिसळले, पुरवठा वेळेवर का बंद केला गेला नाही, जबाबदार अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई कधी केली जाईल, हे क्षुल्लक प्रश्न नाहीत. स्वच्छ पाणी हे उपकार नाही, तर ते जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराच्या हत्येसाठी भाजपचे डबल इंजिन, त्यांचे निष्काळजी प्रशासन आणि त्यांचे असंवेदनशील नेतृत्व पूर्णपणे जबाबदार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in