

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचार, राम मंदिर देणग्यांमधील कथित घोटाळा आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली.
या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह विरोधी बाकांवरील अनेक प्रमुख खासदारांनी हातात फलक घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
प्रेरणास्थळ येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते संसद भवनाच्या मकर दरवाजापर्यंत खासदारांनी भव्य निषेध मार्च काढला.