संसदेत मणिपूर हिंसाचार मुद्यावर विरोधकांचा गदारोळ, कामकाज ठप्प

विरोधकांनी संसदेचे सर्व कामकाज बंद करा आणि केवळ मणिपूर मुद्यावर चर्चा करा, अशी मागणी करून प्रचंड गोंधळ घातला
संसदेत मणिपूर हिंसाचार मुद्यावर विरोधकांचा गदारोळ, कामकाज ठप्प

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास गुरुवारी सुरुवात झाली, मात्र विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये मणिपूर हिंसाचार मुद्यावरून गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांतील कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकांनी संसदेचे सर्व कामकाज बंद करा आणि केवळ मणिपूर मुद्यावर चर्चा करा, अशी मागणी करून प्रचंड गोंधळ घातला.

पंतप्रधानांनी अधिवेशनाच्या सुरुवातीस दिलेल्या प्रतिक्रियेऐवजी सरकारची भूमिका दोन्ही सभागृहात मांडावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यामुळे गुरुवारच्या संपूर्ण दिवसाचे संसदेचे कामकाज ठप्प झाले असून, जोपर्यंत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकर हस्तक्षेप करीत नाहीत तोवर शुक्रवारी देखील हा पेच असाच कायम राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत मणिपूर मुद्यावर थोडक्यात चर्चा केली जार्इल असे आश्वासन दिले, मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी हा प्रस्ताव अमान्य करून सभागृहाचे संपूर्ण काम बंद करून केवळ मणिपूरवर पूर्ण चर्चा करावी, अशी मागणी लावून धरली. त्याला तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांची भक्कम साथ मिळाली.

राज्यसभा सुरुवातीस दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली, पण गदारोळ वाढल्यानंतर दिवसभराचे काम थांबवण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभेत देखील विरोधकांनी याच मुद्यावर प्रचंड गोंधळ घातला. तेथे काही खासदार निषेध नोंदवण्यासाठी विंगेत उतरले. २ वाजल्यानंतर लोकसभा पुन्हा सुरू करण्यात आली तेव्हा डॉ. किरीट सोलंकी अध्यक्ष होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आली. जोशी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मणिपूरवर चर्चा करण्यास राजी असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान चर्चेला उत्तर देतील असेही सांगितले, पण विरोधकांचे त्याने समाधान झाले नाही. त्यांनी विंगेत उतरून निषेध सुरूच ठेवला. अंतत: लोकसभेचेही कामकाज संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष जगदीप धनकर यांनी शुक्रवारचे कामकाज देखील तहकूब केले.

logo
marathi.freepressjournal.in