

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न देण्याच्या प्रमुख मुद्द्यावरून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव मांडणार आहेत.
संसदेचे २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आतापर्यंत खूपच गोंधळाचे राहिले आहे. विरोधी खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दररोज तहकूब केले जात आहे. सोमवारी लोकसभा पुन्हा तहकूब करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाच्या खासदारांनी बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची योजना आखली आहे. विरोधी पक्ष २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात अविश्वास ठराव सादर करेल, कारण त्यासाठी त्यांना २० दिवसांची नोटीस द्यावी लागेल.
विरोधकांचा आरोप
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिले गेले नाही, असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतरच लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणला जाणार असल्याचा निर्णय झाला होता. गेल्या आठवड्यात संसदेच्या खालच्या सभागृहात राहुल गांधी यांनी २०२० च्या चीनसोबतच्या संघर्षावर चर्चा करण्यासाठी माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या 'अप्रकाशित' पुस्तकाचा उल्लेख केला, तेव्हा जोरदार गोंधळ झाला होता.
काँग्रेस खासदारांवर केला होता आरोप
ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना ‘अप्रकाशित लिटरेचर’चा उल्लेख करू नये, असे आदेश दिले होते आणि त्यांना ते वाचण्याची परवानगी नाकारली होती. ५ फेब्रुवारीला सभापती बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात येऊ नये, अशी विनंती केली होती, कारण त्यांना माहिती मिळाली होती की, काही काँग्रेस खासदार सभागृहात मोदींच्या आसनावर येऊन काही अनुचित प्रकार घडवू शकतात.
लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू होण्यापूर्वी आपल्याला बोलू द्यावे, या लोकसभेतील विरोधी पक्षनते राहुल गांधी यांच्या मागणीवरून सरकार आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सोमवारीही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
त्यापूर्वी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आल्यानंतर दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. तेव्हा पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी काँग्रेसचे सदस्य शशी थरूर यांना अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करण्यास सांगितले. तथापि, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे आपले भाषण सुरू होण्यापूर्वी त्यांना बोलण्याची संधी द्यावी, असे थरूर म्हणाले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि विरोधी सदस्यांमध्ये समझोता झाला आहे, त्यानुसार आपल्याला काही प्रश्न उपस्थित करावयाचे आहेत, असे राहुल म्हणाले. मात्र आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही समझोत्याची माहिती नाही, त्यामुळे नोटिशीविना आपण कोणालाही कोणताही प्रश्न उपस्थित करू देऊ शकत नाही, असे संध्या रे म्हणाल्या. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी हस्तक्षेप करीत सांगितले की, अशा प्रकारचा कोणताही समझता झालेला नाही. त्यानंर दोन्ही बाजूचे सदस्य आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने संध्या रे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
अविश्वास ठराव का आणणार?
राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू न देणे हे या अविश्वास ठराव आणण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून राहुल गांधी यांना सदनात बोलू दिले जात नसल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. हेच कारण समोर ठेवत अविश्वास ठराव आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या पद्धतीने आठ विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले, यामुळे विरोधी पक्ष आक्रमक होत लोकसभा सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणत आहे.