नवी दिल्ली : संसद ही कोणत्याही दलासाठी नाही तर देशासाठी आहे, काही पक्ष नकारात्मक राजकारणातच गुंतले असून आपले राजकीय अपयश झाकण्यासाठी ते संसदेचा गैरवापर करीत आहेत, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विरोधकांवर चढविला. विरोधकांनी पंतप्रधानांचा आवाज दाबून गळचेपी करण्याचा प्रयत्न केला हे लोकशाहीला साजेसे नाही, असा हल्लाही मोदी यांनी चढविला.
केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला जाणार असून त्यामध्ये पुढील पाच वर्षांच्या प्रवासाची दिशा ठरविण्यात येणार आहे आणि २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली जाणार आहे, असेही मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनापूर्वी माध्यमांना सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे आणि आता सर्व राजकीय पक्षांनी देशासाठी पुढील पाच वर्षे एकत्र लढले पाहिजे. सर्वपक्षीय खासदारांना आपल्याला सांगावयाचे आहे की, जानेवारी महिन्यापासून आपण राजकीय लढाई लढलो, काही जणांनी मार्ग दाखविला तर काही जणांनी दिशाभूल केली. आता तो काळ सरला आहे, जनतेने आपला कौल दिला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
विकसित भारताचे स्वप्न साकार करा
आता सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की पुढील पाच वर्षे आपल्याला देशासाठी लढावयाचे आहे. पुढील निवडणुका २०२९ मध्ये होणार आहेत. तेव्हा तुम्ही निवडणुकीच्या आखाड्यात जा किंवा संसदेचाही त्यासाठी वापर करा, मात्र आता गरीब, शेतकरी, युवक आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करा, असेही मोदी म्हणाले.