नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या रुग्णालयातून रुग्णांना डॉक्टरांनी केवळ जेनरिक औषधे लिहून द्यावीत, असे आदेश भारतीय वैद्यकीय परिषदेने दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हसमुख मंडाविया यांनी दिली.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, प्रत्येक डॉक्टरने मोठ्या अक्षरात जेनरिक नावांची औषधे लिहून दिली पाहिजेत. आरोग्य महासंचालनालयानेही केंद्राच्या सर्व रुग्णालयात केवळ जेनरिक औषधे लिहून देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत जेनरिक औषधे पोहचली पाहिजेत. म्हणून १० हजार पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रे उघडली आहेत. ३० जूनपर्यंत ९५१२ भारतीय जनऔषधी केंद्रे उघडली आहेत.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत मोफत औषधे देण्याचा भाग म्हणून आरोग्य केंद्रांमध्ये मोफत औषधे देण्यासाठी मदत केली जाते. औषधांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी व बनावट व भेसळयुक्त औषधे निर्माण करणाऱ्यांना दंड ठोठावण्यासाठी औषध व प्रसाधन सामुग्री (सुधारणा) विधेयक २००८ नुसार, १९४० च्या कायद्यात बदल केला आहे. यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली आहेत, असे ते म्हणाले.